जम्मू काश्मीरमधील स्थिती वारंवार अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे. ‘पाकिस्तानने गोळीबार केला, तर भारतीय सैन्य गोळ्या मोजत बसणार नाही,’ असे म्हणत राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा संदेश पाकिस्तानला दिला. हिमाचल प्रदेशातील एका सभेत बोलताना राजनाथ सिंह यांनी हे विधान केले.
शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन वारंवार काश्मीरमधील परिस्थिती चिघळवणाऱ्या पाकिस्तानला राजनाथ सिंह यांनी इशारा दिला आहे.
‘पाकिस्तानकडून वारंवार काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र हे फार काळ चालणार नाही. पाकिस्तानकडून एक जरी गोळी झाडण्यात आली, तरी भारतीय जवानांना गोळ्या बसत मोजण्याची आवश्यकता नाही. भारतीय लष्कर पाकिस्तानने झाडलेल्या गोळ्या मोजत बसणार नाही. लष्कराला तशा सूचना देण्यात आल्या आहेत,’ असे राजनाथ सिंह यांनी हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधील एका सभेत बोलताना म्हटले. लष्कराला कारवाई करण्याची पूर्ण मुभा असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर लष्कराच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी आहे. या हल्ल्यात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. याच हल्ल्याचा संदर्भ देत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. यासोबतच जवानांचे बलिदान विसरता येऊ शकणार नाही, असेदेखील राजनाथ सिंह यांनी म्हटले. भारतीय जवानांच्या हौतात्म्याचे स्मरण करत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कारवायांवर भाष्य केले आहे.
भाजपने आयोजित केलेल्या त्रिदेव संमेलनात सहभागी होण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह हिमाचल प्रदेशात आले होते. पक्षाला बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रीय ठेवण्याच्या उद्देशाने संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल, भाजपचे नेते अनुराग ठाकूर उपस्थित होते. अनुराग ठाकूर हमीरपूरचे भाजपचे खासदार आहेत. सध्या काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशात नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे.