Rajnath Singh speaks on Operation Sindoor : देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लोकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली, आपल्या सैनिकांनी दहशतवाद्यांना धर्माच्या आधारावर नाही तर त्यांच्या कर्माच्या आधारावर ठार केले, असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती, यानंतर भारताना ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राजस्थानच्या जोधपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी यासंबंधीत विधान केले. भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर विश्वास ठेवतो आणि जाती किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
“आपल्या लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि या कारवाईमध्ये निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ले केले गेले.” पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेक तळांवर हे हल्ले करण्यात आले, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि डिफेन्स आणि स्पोर्ट अकादमीच्या उद्घाटनासाठी राजनाथ सिंह हे जोधपूर येथे आले होते.
ऑपरेशन सिंदूरचा अभ्यासक्रमात समावेश
काही दिवसांपूर्वीच एनसीईआरटीने (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) त्यांच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश केला आहे. ऑपरेशन सिंदूरचं लष्करी व तांत्रिक यश आणि त्यातून दिलेला राजकीय संदेश या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. एनसीईआरटीने दोन अभ्यासक्रम जारी केले आहेत. त्याअंतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेबाबतची माहिती दिली जाणार आहे.
या अभ्यासक्रमात म्हटलं आहे की, पाकिस्तानने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात त्यांचा सहभाग नसल्याचा दावा केला असला तरी हा हल्ला थेट त्यांच्या लष्करातील अधिकारी व राजकीय नेतृत्वाच्या आदेशानेच झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु, ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती. शांततेसाठी व स्वसंरक्षणासाठी उचललेलं पाऊल होतं. ही मोहीम भारतासाठी सन्मान व दृढनिश्चयाचं प्रतीक आहे.