नवी दिल्ली : ‘‘बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन आम्ही सांगितले होते की, भाजपची युती तोडा नाही तर तुमचा उद्धव ठाकरे होईल. त्यानंतर तिथे घटनाक्रम (सत्तांतर) झाला’’, असे सांगत ‘’भारतीय किसान युनियन’’चे नेते-प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनाचा पुढील टप्पा बिहारमधून सुरू होईल, असा दावा केला.

‘‘अखिल भारतीय किसान सभे’’चे अध्यक्ष अशोक ढवळे यांच्या ‘’व्हेन फार्मर्स स्टुड अप: हाऊ द हिस्टोरिक किसान स्ट्रगल इन इंडिया अनफोल्डेड’’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात सोमवारी संयुक्त किसान मोर्चेच्या सुकाणू समितीतील राकेश टिकैत, डॉ. दर्शन पाल, हन्नान मौल्ला आदी सहभागी झाले होते. दिल्लीच्या वेशीवर वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनातील प्रत्यक्ष अनुभव या पुस्तकात मांडले आहेत.

वादग्रस्त कायदे केंद्राने मागे घेतले असले तरी, ते बिहारमध्ये दहा वर्षांपूर्वी लागू झाले आहेत. तिथे कृषि बाजाराची व्यवस्थाच नाही. आता शेतकऱ्यांचे पुढील आंदोलन बिहारमधून सुरू होणार आहे. आता तिथे सत्ताबदल झाला आहे. बिहारमध्ये गेलो तेव्हा नितीशकुमार यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी भाजपचा हात सोडला नाही तर, त्यांना सत्ता गमवावी लागेल. महाराष्ट्रात जसे भाजपने शिवसेना फोडली तसे बिहारमध्येही होऊ शकेल आणि नितीशकुमार यांना उद्धव ठाकरे यांच्यासारखा संघर्ष करावा लागेल, असे आम्ही नितीशुकमार यांना समजावून सांगितले होते. त्यानंतर बिहारमध्ये राजकीय घटनाक्रम झाले, असे टिकैत म्हणाले.

‘‘देशात लोक केंद्रातील  सरकारवर नाराज आहेत. रेल्वे कर्मचारी असेल, पोलीस असतील अगदी न्यायाधीश सुद्धा दु:खी आहेत. पण, उघडपणे ते बोलत नाहीत’’, असे सांगत टिकैत म्हणाले, पूर्वी राजकीय पक्ष फोडले जात. आता भाजप शेतकरी संघटना फोडू लागला आहे. त्यामुळे  पुढील टप्प्यांमध्ये भाजपच्या फोडाफोडीचे राजकारण रोखण्यासाठी रणनिती आखावी लागणार आहे, असे टिकैत म्हणाले.

जंतर-मंतरवर आंदोलन

‘संयुक्त किसान मोर्चा’मध्ये सहभागी झालेल्या काही शेतकरी संघटनांनी सोमवारी जंतर-मंतर गाठून बेरोजगारी, हमीभाव आदी मुद्दय़ांसाठी आंदोलन केले. पंजाब, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशमधील संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या मात्र, आंदोलनाची हाक ‘संयुक्त किसान मोर्चा’ने नव्हे तर, पंजाबमधील ‘भारतीय किसान युनियन’-दल्लेवाल गटाने दिली होती.