बहीण आणि भावाचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. बहीणीची रक्षा करणारा भाऊ आणि त्याला प्रेमाने सांभाळणारी बहीण असं या नात्याचं वर्णन केलं जातं. या नात्याला जात, धर्म, पंथ यांचे कोणतेही निकष लागू होत नाहीत. पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमधील संबंध अनेकदा तणावाचे असल्याचे आपण पाहतो. मागील अनेक वर्षांपासून या दोन देशांमध्ये ताणतणाव असल्याचे पहायला मिळते. मात्र याच देशातील एक भगिनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागील ३६ वर्षांपासून बांधत आहे. कमर मोहसिन शेख असे या भगिनीचे नाव असून ती अतिशय मायेने मोदींना दरवर्षी न चुकता रक्षाबंधनाला राखी बांधते. मोदीही तिच्या राखीचा तितक्याच आत्मीयतेने स्विकार करतात.

शेख या मूळच्या पाकिस्तानातील असून लग्नानंतर त्या भारतात आल्या. त्यानंतर त्या दिल्लीतच स्थायिक झाल्या. त्या आपल्याला भारतीयच मानतात. भारतात आपले फारसे नातेवाईक नसून याठिकाणी आल्यावर आपल्याला माहेरची खूप आठवण यायची. याचदरम्यान काही कामानिमित्त आपली मोदींशी भेट झाली. एकदा आपण रक्षाबंधनाच्या दिवशी भेटलो होतो. त्यावेळी मी सहजच त्यांना राखी बांधण्याविषयी विचारले. मोदींनीही कोणताही विचार न करता आपला हात पुढे करत राखी बांधून घेतली. त्यानंतर मागील जवळपास ३६ वर्ष आपण मोदींनी राखी बांधत असल्याचे त्या म्हणाल्या. मागील काही वर्षांपासून मोदी आपल्या कामात व्यग्र असल्याने आपली भेट होऊ शकली नसल्याचेही त्यांनी सांगितले.