गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाल्यानंतर आता ज्ञानवापी व कृष्ण जन्मभूमी इथल्या मंदिरांचा मुद्दा चर्चेत आला आहे. ज्ञानवापी परिसरातील एका तळघरात सध्या पूजाविधी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. यावर देशभरात मोठी चर्चा चालू असतानाच आता राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी महाराज यांनी केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. “आम्हाला देशातली तीन मंदिरं शांततापूर्ण प्रक्रियेतून मिळाली, तर आम्ही मागचं सगळं विसरून जाऊ”, असं गोविंद देव गिरी महाराज म्हणाले आहेत.

“…तर आमची इतर मंदिरांकडे लक्ष देण्याची इच्छा नाही”

आळंदीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोविंद देव गिरी महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी मंदिरांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. “देशातील तीन मंदिरं मुक्त झाली तर आम्हाला इतर मंदिरांकडे पाहाण्याची इच्छाही नाही. कारण आम्हाला भविष्याकडे पाहायचं आहे. भूतकाळात जगायचं नाहीये. देशाचं भविष्य चांगलं असायला हवं. त्यामुळे जर ही तीन मंदिरं आम्हाला सामोपचारानं, प्रेमानं मिळाली, तर आम्ही मागच्या इतर सर्व गोष्टी विसरून जाऊ”, असं गोविंद देव गिरी महाराज यावेळी म्हणाले.

इतर मंदिरांचं काय?

दरम्यान, यावेळी गोविंद देव गिरी महाराज यांना इतर मशिदींसंदर्भात मुद्दे उपस्थित केले जात असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू, असं ते म्हणाले. “त्या लोकांनाही आम्ही समजवून सांगू. सगळ्यांना एकाच भाषेत सांगण्याची आवश्यकता नसते. काही ठिकाणी समजूतदार लोक असतात, काही ठिकाणी नसतात. त्यामुळे त्या त्या ठिकाणी ज्या प्रकारची स्थिती आहे, त्यानुसार भूमिका घेऊन आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. आम्ही कोणत्याही प्रकारे अशांतता निर्माण होऊ देणार नाही”, असं गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितलं.

ज्ञानवापी मशीद प्रकरणी राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “मुस्लिम बांधवांनी मशीद…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आम्हाला राम मंदिराच्या मुद्द्यावर शांततापूर्ण पद्धतीने उपाय मिळाला. आम्हाला आशा आहे, की इतर मंदिरांच्या बाबतीतही शांततापूर्ण मार्गानेच उपाय मिळेल”, असंही ते म्हणाले.