भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक करीत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार रामकृपाल यादव यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी जुन्या पक्षावरही टीका केली. राष्ट्रीय जनता दल आपल्या मूळ तत्त्वांपासून दूर जात असल्याची टीका यादव यांनी केली.
नरेंद्र मोदी देशाला नवी दिशा देऊ शकतात, असे सांगून ते म्हणाले, एका चहा विकणाऱया व्यक्तीला भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले आहे. पक्षाने हा मोठा निर्णय घेतला आहे. बिहारमधील सध्याच्या स्थितीवरही त्यांनी टीका केली. बिहारची सध्याची अवस्था बघून आपल्याला अतिशय दुःख होते आहे. बिहारमध्ये कामापेक्षा घराण्याला जास्त महत्त्व दिले जाते, असेही त्यांनी सांगितले.