अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराची उभारणी करण्यासाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून जोमाने काम सुरू असून राम मंदिराच्या उभारणीसाठी भारतभरातून जनतेकडून देणगी देखील स्वीकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर आता अशा प्रकारे घरोघरी जाऊन मंदिर उभारणीसाठी देणगी गोळा करण्याची मोहीम बंद करण्यात आल्याचं राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यासोबतच, आत्तापर्यंत राम मंदिरासाठी अडीच हजार कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

३ वर्षांत मंदिर तयार होणार

राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात एएनआयशी बोलताना माहिती दिली आहे. ते म्हणाले, “राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करण्याची मोहीम आता बंद करण्यात आली आहे. लोकांना जर देणगी द्यायची असेल, तर त्यांनी ती ऑनलाई पद्धतीने द्यावी. त्यासाठी ट्रस्टच्या वेबसाईटवर ते जाऊ शकतात. मंदिराच्या समोरच्या बाजूची जमीन अधिग्रहित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीची बोलणी देखील सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. पण येत्या ३ वर्षांमध्ये राम मंदिराची उभारणी पूर्ण होईल.”

 

४ मार्चपर्यंत अडीच हजार कोटींचा निधी!

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीची रक्कम अडीच हजार कोटींपर्यंत पोहोचल्याचं स्पष्ट झालं आहे. “४ मार्चपर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या चेकनुसार राम मंदिरासाठी सुमारे अडीच हजार कोटींची देणगी जमा झालेली आहे”, असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आल्याचं एएनआयने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram mandir teerth kshetra trust receives 2 5 thousand crore donation for the temple pmw
First published on: 06-03-2021 at 20:20 IST