अयोध्येत समाजाच्या सर्व गटांच्या मतैक्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राममंदिराची उभारणी करता येईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला आहे. केंद्रात अन्न प्रक्रिया राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच मतदारसंघाला भेट दिली. त्या वेळी ज्योती यांनी वार्ताहरांना सांगितले, की समाजातील सर्व घटकांच्या मतैक्याने पंतप्रधा न मोदी यांच्या नेतृत्वाखाली राम मंदिराची बांधणी होऊ शकते. अयोध्या हे रामाचे जन्मस्थान आहे व जगातील लोक त्याची पूजा करतात, त्यामुळे रामाचे मंदिर बांधणे हे देशवासीयांचे कर्तव्यच आहे.
उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्री महंमद आझम खान हे फटकळ असून ते त्यांच्याच सरकारची प्रतिमा खराब करीत आहेत असा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार पाडण्यास विरोधकांपेक्षा आझम खान पुरेसे आहेत, असा आरोप त्यांनी केला.  मतदारसंघाचा सर्वागीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.