Acharya Balkrishna Controversy: बाबा रामदेव यांच्या योगाची जशी चर्चा असते, तशीच त्यांच्या हजारो कोटींच्या ‘पतंजली’ साम्राज्याचीही चर्चा असते. बाबा रामदेव यांचा हा व्यवसाय आता तब्बल ६ हजार कोटींच्या घरात गेला असून त्याचा कारभार त्यांच्यासह त्यांचे सहकारी व कंपनीचे सहसंस्थापक बाळकृष्ण हे पाहतात. पण बाळकृष्ण फक्त याच व्यवसायात नसून इतरही व्यवसायांमध्ये असून त्यासंदर्भातली एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं केलेल्या एक्सक्लुझिव्ह इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये उत्तराखंडमध्ये बाळकृष्ण यांची ही ‘कमाल’ समोर आली आहे!

जॉर्ज एव्हरेस्ट पार्कचं निविदा प्रक्रियेचं सत्य!

गेल्या वर्षी उत्तराखंड सरकारने मसुरीजवळच्या ब्रिटिशकालीन जॉर्ज एव्हरेस्ट इस्टेट पार्कच्या १४२ एकर जमिनीवर अॅडव्हेंचर टुरिझम विकसित करण्यासाठी कंत्राट काढलं. यासाठी तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या. यातल्या दोन कंपन्या थेट आचार्य बाळकृष्ण यांच्या मालकीच्या होत्या, तर तिसरी कंपनीही सदर कंत्राट मिळवल्यानंतर दोनच महिन्यांत त्यांच्या मालकीची झाली! या प्रकल्पात पार्किंग, रस्ते, हेलिपॅड, लाकडी तंबू, कॅफे, दोन म्युझियम आणि अवकाश निरीक्षण केंद्र अशा सुविधांची उभारणी उत्तराखंड टुरिझम विभागाने केली. त्याची देखभाल आणि विकास करण्याचं काम कंत्राटाद्वारे देण्यात आलं.

कंत्राटदार कंपन्यांपैकी प्रकृती ऑर्गॅनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि भरुआ अॅग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांमध्ये बाळकृष्ण यांची अनुक्रमे ९९.८५ टक्के व ९९.९८ टक्के मालकी आहे. निविदा सादर झाल्या, तेव्हा तिसऱ्या राजस एरोस्पोर्ट्स अँड अॅडव्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत त्यांची २५.०१ टक्के मालकी होती. पुढच्या काही महिन्यांत ते कंपनीचे ६९.४३ टक्के शेअरहोल्डर झाले!

एका वर्षांत उत्पन्न ८ पट वाढलं!

निविदा प्रक्रियेत स्पष्टपणे गैरप्रकार घडला असूनही पर्यटन विभागाने मात्र सारंकाही न्याय्य पद्धतीने झाल्याचा दावा केला आहे. बाळकृष्ण यांनी हा सगळा खटाटोप कशासाठी केला हे जॉर्ज एव्हरेस्ट पार्कमधील सेवा-सुविधांच्या कंत्राटातील उत्पन्नाचे आकडे पाहिल्यास सहज लक्षात येईल. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या वर्षात राजस एरोस्पोर्ट्सचं एकूण उत्पन्न १.१७ कोटी इतकं होतं. पुढच्याच वर्षी २०२३-२४ मध्ये ते थेट ९.८२ कोटींवर म्हणजेच ८ पटींनी वाढलं! तशी या काळात त्यांच्या तोट्यात वाढ झाली. तो ५८ लाखांवरून २.३५ कोटींवर गेला. पण हे प्रमाण फक्त चारपट होतं.

जॉर्ज एव्हरेस्ट इस्टेट प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेतील ‘आर्थिक’ गणित!

हा वाढलेला नफा जॉर्ज एव्हरेस्ट पार्कमधील सुविधांसाठीच्या शुल्क आकारणीतून जमा झाल्याचं सहज लक्षात येईल. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून इथे २.२ लाख पर्यटकांनी भेट दिली असून ३४०२ पर्यंटकांनी हेलिकॉप्टर सुविधेचा लाभ घेतला आहे.

सुविधांसाठीचे शुल्क…

दुचाकी पार्किंग (चार तास) – १०० रुपये
चारचाकी पार्किंग (चार तास) – २०० रुपये
वाहन म्युझियमपर्यंत नेण्यास (चार तास) – १००० रुपये
प्रत्येक अतिरिक्त तासासाठी – २०० रुपये
१२ वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश शुल्क – १००
प्रौढांसाठी प्रवेश शुल्क – २०० रुपये
एअर सफारी (५ मिनिटे) – ५००० रुपये
एअर सफारी (१० मिनिटे) – ७९९९ रुपये
हिमालयन एक्सपिडिशन (एक तास) – ३०९९९ रुपये
चार्टर्ड हेलिकॉप्टर (एक तास) – १ लाख ८४ हजार रुपये

राजस एरोस्पेस राज्य सरकारच्या पर्यटन विभागाला सेवा शुल्क म्हणून १ कोटी रुपये (जीएसटी वगळून) वर्षाला देते. दरवर्षी यात फक्त ३ टक्क्यांची वाढ करण्याची तरतूद आहे.

‘असा’ झाला जॉर्ज पार्कचा घोटाळा!

तर आचार्य बाळकृष्ण यांच्या मालकीच्या प्रकृती ऑर्गॅनिक्स आणि भरुआ अॅग्री सायन्स यांना कंत्राट मिळालं नाही. पण ज्या राजस एरोस्पेसला कंत्राट मिळालं, त्यातल्या शेअर्सची खरेदी वरच्या कंपन्यांनी केली. २१ जुलै २०२३ ला राजसला कंत्राटाचं पत्र मिळालं. ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रकृती व भरुआनं राजसमधील १७.४३ टक्के शेअर्स खरेदी केले. याशिवाय, भरुआ अॅग्रो, भरुआ सोल्युशन्स, फिट इंडिया ऑर्गॅनिक आणि पतंजली रिव्होल्यूशन या बाळकृष्ण यांच्याच मालकीच्या चार कंपन्यांनी मिळून स्वतंत्रपणे राजसमधील ३३.२५ टक्के शेअर्स खरेदी केले! शिवाय बाळकृष्ण यांच्याकडे राजसमधील १८.७५ टक्के शेअर्सची थेट मालकी आधीपासूनच आहे!

राज्य पर्यटन विभागाची भूमिका काय?

दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात उत्तराखंड पर्यंटन विभागाचे उपसंचालक अमित लोहानी यांना विचारणा केली असता त्यांनी सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याचा दावा केला. “कुणीही निविदा भरू शकत होतं. या प्रक्रियेत कुणीही सहभागी होऊ शकत होतं. काही व्यक्तींची इतर कंपन्यांमध्येही भागीदारी असणं हा काही गैरप्रकाराचा मुद्दा नाही”, असं त्यांनी सांगितलं. “आम्हाला काही त्या परिसरात ५०० होमस्टे बांधायचे नव्हते. त्या परिसराची काळजी घेणारं कुणीतरी हवं होतं. राजस ते करत आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.