PM Modi Sixth Ramnath Goenka Lecture: सत्यकथन, उत्तरदायित्व आणि वैचारिकता यांची बांधिलकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रामनाथ गोएंका लेक्चर’मध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडले. नवी दिल्लीत निमंत्रितांच्या उपस्थितीत हे व्याख्यान सुरू आहे. यंदा या व्याखानाचे यंदा सहावे वर्ष आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
‘रामनाथ गोएंका लेक्चर’मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत विकसित होण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी अधीर आहे. आपण सर्वजण पाहत आहोत की २१व्या शतकाची २५ वर्षे किती वेगाने पूर्ण झाली आहेत. कित्येक आव्हाने आली, पण ती आव्हाने भारताच्या विकासाच्या वेगाला रोखू शकली नाहीत. आपण सर्वांनी पाहिले असेल, गेली ४–५ वर्षे संपूर्ण जगासाठी आव्हानात्मक ठरली आहेत. २०२० मध्ये कोरोना आला, त्यामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे संकट होते. यामुळे जगाच्या पुरवठा साखळीवरही परिणाम झाला, ज्यामुळे संपूर्ण जगात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर ही परिस्थिती सावरू लागली, पण आपल्या शेजारी देशांमध्ये गृहकलह सुरू झाले. इतक्या सर्व गोष्टी घडत असतानाही आपल्या अर्थव्यवस्थेने सर्वोत्तम विकासदर प्राप्त केला.”
तत्पूर्वी ‘रामनाथ गोएंका लेक्चर’बाबत माहिती देताना एक्स्प्रेस समूहाचे अध्यक्ष विवेक गोएंका यांनी म्हटले होते की, “सरकार आणि माध्यमस्वातंत्र्य यांच्यातील संवाद हा आत्मविश्वासपूर्ण देशासाठी अत्यावश्यक आहे. रामनाथ गोएंका यांच्या नावाने चालवण्यात येणाऱ्या व्याख्यानात पंतप्रधानांची उपस्थिती याचेच उदाहरण आहे. आजघडीला जगातील सत्तास्थानांची उलथापालथ होत आहे. अनेक देश आपली भूमिका आणि ध्येयधोरणे नव्याने मांडत आहेत. अस्थैर्य आणि अनिश्चितता हे कळीचे मुद्दे आहेत. अशा वेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांचे विचार ऐकण्याला विशेष महत्त्व आहे.”
