Prajwal Revanna sentenced to life imprisonment for rape: जेडीएस पक्षाचा माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णाला (वय ३४) बलात्कार प्रकरणात जन्मठेप सुनावण्यात आली आहे. कालच बंगळुरूच्या आमदार / खासदार विशेष न्यायालयाने चार पैकी एका बलात्कार प्रकरणात त्याला दोषी ठरविले होते. आज त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्ज्वल रेवण्णाला दोषी ठरविण्यात आले होते. २०२१ मध्ये पीडितेवर दोनदा बलात्कार झाल्याचा आरोप असून, प्रज्ज्वल रेवण्णाने हे कृत्य त्याच्या मोबाईलवर चित्रित केले होते.

बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या प्रज्वल रेवण्णाविरुद्ध चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. या पथकाने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. तसेच पीडितांच्याही तक्रारी घेऊन महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. याआधारावर प्रज्ज्वलवर कलम ३७६ (२) (न) नुसार वारंवार बलात्कार करणे, कलम ५०६, कलम ३५४ अ, ब आणि क नुसार विविध गुन्हे दाखल केले होते.

ड्रायव्हरने प्रकरण उघडकीस आणले

रेवण्णाचा माजी वाहन चालक कार्तिक एन. (वय ३४) हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असून त्यानेच हे प्रकरण बाहेर आणले होते. प्रज्ज्वल रेवण्णाचे अश्लिल व्हिडीओ सार्वजनिक केल्याबद्दल कार्तिक एन. वरही गुन्हा दाखल झाला होता. सोमवारी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी कार्तिकने सांगितले की, त्याने एकदा प्रज्ज्वल रेवण्णाचा मोबाइल चोरून पाहिला होता. त्यात या प्रकाराचा उलगडा झाला.

२०२२ साली कार्तिक आणि प्रज्ज्वल रेवण्णा आणि त्याच्या कुटुंबियांचे जोरदार भांडण झाले. ज्यामुळे कार्तिकने त्यांची नोकरी सोडली. कार्तिकने पुढे सांगितले की, प्रज्ज्वल रेवण्णाच्या व्हिडीओचा पेन ड्राईव्ह त्यानेच भाजपाचे नेते आणि वकील जी. देवराज गौडा यांना दिला होता. त्यांनी हासन विधानसभा मतदारसंघातून प्रज्ज्वलचे वडील एचडी रेवण्णा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

Prajwal Revanna sex video pen drive
प्रज्ज्वल रेवण्णाच्या फोनमध्ये ३०-४० महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचे अनेक व्हिडीओ आढळून आले आहेत, असे त्याच्या वाहनचालकाने सांगितले.

देवराज गौडा यांचे म्हणणे होते की, त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहे त्यात २९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा त्यांनी केला. महिलांचे लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जात होता, असेही देवराज यांनी म्हटले होते.