US Advisory भारताला भेट द्यायची असेल तर अमेरिकेतील नागरिकांनी खासकरुन महिलांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी की भारतात गुन्हेगारी, बलात्कार, दहशतवाद हे सगळं प्रमाण वाढतं आहे असा सल्ला अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना दिला आहे. अमेरिकेतल्या नागरिकांनी आणि खास करुन महिलांनी भारत दौरा करण्याच्या आधी हे मुद्दे विचारात घेऊन मगच वाटलं तर हा दौरा करावा. भारतात गुन्हेगारी अतिवेगाने वाढते आहे असं अमेरिकेने त्यांच्या सूचना सूचीमध्ये म्हटलं आहे. ही सूचना सूची (Advisory) अमेरिकेच्या US Department of State ने पोस्ट केली आहे.
अमेरिकेने सूचना सूची मध्ये कुठले मुद्दे मांडले आहेत?
विशिष्ट सुरक्षेबाबत घ्यायची काळजी
कायदेशीर बाबी ज्या अमेरिकेतील नागरिकांनी भारत दौऱ्याच्या आधी लक्षात घ्यायच्या आहेत.
कुठल्या स्थळांना भेटी देऊ शकता? तिथले अडसर काय असू शकतात? या मुद्द्यांवर या सूचना सूचीमध्ये भाष्य करण्यात आलं आहे.
भारत देश क्रौर्याने माखलेला
अमेरिकेने नागरिकांसाठी जी सूचना सूची प्रसिद्ध केली आहे त्यात भारत हा देश क्रौर्याने माखलेली गुन्हेगारी करणारा देश आहे असा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच या ठिकाणी कधीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी स्थिती आहे. ज्या ठिकाणी कायम पर्यटकांचा वावर असतो, ज्या ठिकाणी मोठी वाहतूक व्यवस्था, बाजारपेठ आणि सरकारी सोयी सुविधा असतात अशा ठिकाणीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो असं अमेरिकेने सूचना सूचीतून त्यांच्या नागरिकांना बजावलं आहे. अमेरिकेतल्या महिलांनी एकटीने भारत दौरा करु नये कारण बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांसारखे गुन्हे तिच्याबाबती घडण्याची शक्यता आहे असंही या सूचना सूचीत म्हटलं आहे.
सूचना सूचीनुसार कुठे जाणं धोकादायक?
या सूचना सूचीमध्ये ज्या ठिकाणी भारतात कुठल्या ठिकाणी सर्वाधिक जाणं धोकायदायक ठरु शकतं? ते देखील नमूद करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीर (लेह आणि लडाख वगळून), भारत पाकिस्तान सीमाभाग, मध्य आणि पू्र्वोत्तर भारत जिथे माओवादी कारवाया होतात असे भाग, मणिपूर, तसंच उत्तरपूर्व भागातील काही राज्यांमध्येही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. एवढंच नाही तर या सूचना सूचीत असंही म्हटलं आहे की अमेरिकेतल्या ज्या कर्मचाऱ्यांना भारत दौऱ्यावर पाठवलं जातं आहे त्यांना पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि ओडिशा या राज्यांमध्ये पाठवायचं असेल तर आधी विशेष संमती घ्यावी लागेल.
भारतात गेल्यास तिथल्या कायद्यांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना
भारतात जे काही कायदे आहेत ते अमेरिकेतील पर्यटकांनी काटेकोरपणाने पाळले पाहिजेत. सॅटेलाइट फोन, मुदत संपलेला व्हिसा या सगळ्या गोष्टींमुळे तिथले पोलीस तुम्हाला ताब्यात घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात दंडही भरावा लागू शकतो.