बलात्कार काहीवेळा चुकीचे आणि काहीवेळा बरोबर असतात ही एक सामाजिक समस्या आहे. याला कोणतेही सरकार प्रतिबंध घालू शकत नाही अशी मुक्ताफळे उधळून मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी नवा वादाला तोंड फोडले आहे.
मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या गौर यांनी कोणतेही सरकार राज्यात बलात्काराच्या घटनांवर पूर्णपणे प्रतिबंध घालण्याची शाश्वती देऊ शकत नाही आणि प्रकरण घडल्यानंतरच कारवाई होऊ शकते असे वादग्रस्त विधान केले आहे. विरोधकांनी गौर यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
बाबूलाल गौर म्हणाले की, “बलात्कार हा संपूर्णपणे महिला आणि पुरूष यांच्यावर अवलंबून असलेला सामाजिक गुन्हा आहे. काहीवेळा बरोबर तर काहीवेळेला चुकीचा. जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत काहीच करता येणार नाही. तसेच राज्यात बलात्काराच्या घटनांना पूर्णपणे पायबंद घालण्याची शाश्वती कोणतेही सरकार देऊ शकत नाही. घटना घडल्यानंतरच कारवाई करता येते” असेही गौर म्हणालेत.
त्याचबरोबर महिलांनी स्वरक्षणासाठी ज्युडो, कराटेचे प्रशिक्षण घ्यायला हवे त्यामुळे इच्छित असल्याशिवाय तुम्हाला स्पर्श करण्याची हिंमत कोणीही करणार नाही असा सल्लाही गौर यांनी महिलांना देऊ केला आहे. त्याचबरोबर चित्रपटातील ‘आयटम साँग्स’ सामाजिक वातावरण बिघडवत असल्याचे मत गौर यांनी व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape is sometimes wrong and sometimes right a social problem no govt can prevent it babulal gaur
First published on: 06-06-2014 at 04:36 IST