मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे अनेक कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत चार चिमुरड्यांना जीव गमवावा लागला. दरम्यान ३६ नवजात बालकांना आगीतून वाचवण्यात आलं. या दुर्घटनेच्या आठवणी अनेकजण आयुष्यभर विसरु शकणार नाहीत.

या भयावह दुर्घटनेतून आठ चिमुरड्यांचा जीव वाचवणारे भोपाळचे राशीद खान आपल्या भाच्याला मात्र वाचवू शकले नाहीत. राशीद खान यांची बहीण इरफानाने लग्नाच्या १२ वर्षानंतर बाळाला जन्म दिला होता. पण या दुर्घटनेमुळे सात दिवसातच त्यांना त्यांचं बाळ गमवावं लागलं. आपल्या भाच्याला दफन करताना राशीद खान यांना अश्रू आवरत नव्हते. यावेळी त्यांनी नेमकं रुग्णालयात काय झालं याची माहिती दिली.

राशीदने सांगितलं की, त्या रात्री घरी जेवत असताना बहिण इरफानाने फोन करुन रुग्णालयात आग लागल्याची माहिती दिली. इरफाना फार घाबरली होती. राशीद जेव्हा रुग्णालयाच्या तिसऱ्या माळ्यावर स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट (एसएनसीयू) पोहोचले तेव्हा सगळीकडे धावपळ सुरु होती. चिंताग्रस्त डॉक्टर आणि नर्स लहान मुलांना हातात घेऊन धावत होते.

ते चित्र पाहिल्यानंतर राशीद यांनी आपल्या नवजात भाच्याचा शोध घेण्याऐवजी डॉक्टर आणि नर्सेसची मदत करण्यास सुरुवात केली. जर मी या लहान मुलांचा जीव वाचवला तर अल्लाह माझ्या मुलाचं रक्षण करेल असा विचार माझ्या मनात आल्याचं राशीद यांनी सांगितलं.

राशीद यांनी सांगितलं की, त्यांनी आठ नवजात बाळांना वाचवलं पण आपल्या भाच्याला वाचवू शकले नाहीत. सगळ्या खोलीत धूर होता आणि आगदेखील होती. आम्ही तारा कापल्या आणि विजेवर चालणारी उपकरणं बाहेर काढली व लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डमध्ये नेलं अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे त्यांनी सांगितलं की, त्यावेळी झालेल्या धावपळीत मी आपल्या भाच्याचा शोध घेतला नाही. आठ मुलांना वाचवल्यानंतर जेव्हा सर्व बाळांना बाहेर काढण्यात आलं आहे असं कळालं तेव्हा मी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर अर्ध्या तासाने मी माझ्या भाच्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. ३ वाजता मला शवगृहात जाऊन पाहण्यास सांगितलं. यानंतर राशीद यांना तिथे आपल्या भाच्याचा मृतदेह दिसला.

राशीद खानची बहिण इरफाना भोपाळच्या गौतम नगरची रहिवासी आहे. लग्नाच्या १२ वर्षानंतर त्यांनी बाळाला जन्म दिला होता. जन्मानंतर त्याला श्वास घेताना त्रास होत होता. यामुळे त्याला कमला नेहरु बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इरफाना यांच्या बाळासोबत अन्य तीन चिमुरड्यांनाही आपला जीव गमवावा लागला.