Ratan Tata : देशातल्या नामांकित उद्योजक आणि व्यावसायिक आणि उद्योग जगतातले पितामह रतन टाटा ( Ratan Tata ) यांचं निधन झालं. ९ ऑक्टोबरला मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात रतन टाटांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा हे असे उद्योजक होते ज्यांनी फक्त स्वतःपुरता विचार केला नाही. तर लाखो लोकांचं आपल्या व्यवसायाच्या माध्यमांतून भलं केलं. त्यांच्या जाण्याने उद्योगविश्व, मनोरंजन विश्व, राजकीय विश्व हळळलं आहे. तितकंच दुःख सामान्य माणसालाही झालं आहे. घरातल्या मीठापासून ते गळ्यातल्या सोन्यापर्यंत आणि परवडणाऱ्या घरांपासून ते उत्तुंग भरारी घेणाऱ्या विमानांपर्यंत जवळपास सगळ्याच क्षेत्रात टाटा यांची कारकीर्द झळालेली होती. टाटा ग्रुपला देशातला विश्वासार्ह ग्रुप बनवण्यासाठी रतन टाटांनी आयुष्य वेचलं. रतन टाटा ( Ratan Tata ) यांच्या अनेक आठवणी सांगितल्या जात आहेत. याच निमित्ताने काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी सांगितलेली एक आठवणही चर्चेत आली आहे.
राज ठाकरेंची पोस्ट काय?
“रतन टाटा ( Ratan Tata ) यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकात आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी ( Ratan Tata ). बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि ‘लायसन्स राज’शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले.”
लायसन्स राज संपण्याच्या उंबरठ्यावर असताना..
राज ठाकरे पुढे म्हणतात, “योगायोग बघा की ‘लायसन्स राज’ संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. भारतीय उद्योगाच्या पायातल्या शृंखला गळून पडल्या, पण पुरेशी ताकद आलेली नसताना ऑलिंपिक्स स्पर्धेत उतरल्यावर जे होईल तशी काहीशी अवस्था भारतीय उद्योग जगाची झाली होती. पण रतन टाटांना ( Ratan Tata ) खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं. त्यामुळे कॉफीपासून, हातातल्या घड्याळापर्यंत ते जगातील सगळ्यात मौल्यवान आयटी कंपनी टीसीएस बनवण्यापर्यंत ते ब्रिटिशांचा मानबिंदू असणारी जॅग्वार आणि लँड रोव्हर कंपनी ताब्यात घेण्यापर्यंत अनेक सीमोल्लंघने रतन टाटांनी ( Ratan Tata ) साध्य केली.” ही पोस्ट राज ठाकरेंनी केली आहे. तसंच जेआरडी टाटांचा निरोप आल्यानंतर एका घरात निधन झालं म्हणून रतन टाटा गेले तेव्हा नेमकं काय घडलं? ही भन्नाट आठवणही सांगितली होती.
राज ठाकरेंनी सांगितलेली रतन टाटांची मिश्कील आठवण
“रतन टाटा ( Ratan Tata ) माझ्या घरी आले होते. आम्ही वरती गप्पा मारत बसलो होतो. मी नावं नाही सांगत एक मोठी उद्योगपती व्यक्ती होती, त्यांच्या मिसेस गेल्या. जेआरडी टाटा यांनी रतन टाटांना सांगितलं की तू त्यांच्या घरी जाऊन भेटून या कारण जेआरडी टाटा परदेशात होते. रतन टाटांनी मला सांगितलं मी त्या घरी गेलो, कारमधून उतरलो आणि बंगल्याच्या बाहेर गर्दी होती. सगळी माणसं पांढरे कपडे घालून बसली होती. तिथे एका खुर्चीवर वयस्कर बाई बसल्या होत्या. मी गेलो त्यांना मी सॉरी म्हटलं, आदरांजली व्यक्त केली. जेआरडींनी मला पाठवलं आहे आपले कौटुंबिक संबंध होते आता जे घडलं ते वाईट झालं वगैरे सांगितलं.” असं राज ठाकरे म्हणाले.
रतन टाटा मला म्हणाले त्यानंतर कुठेही गेलो की आधी खुर्ची पाहायचो-राज ठाकरे
पुढे राज ठाकरे म्हणाले, “रतन टाटा म्हणाले. आमची श्रद्धांजली वगैरे मी म्हटलं आणि त्यानंतर मी तिथून बाहेर आलो असं रतन टाटांनी सांगितलं. त्यानंतर रतन टाटांनी ( Ratan Tata ) त्यांच्या बरोबरच्या माणसाला विचारलं की अरे आपण आतमध्ये गेलो होतो पण बॉडी काही दिसली नाही कुठे. तर त्या माणसाने मला सांगितलं की ज्यांच्याशी तुम्ही बोललात ती बॉडी होती. कारण त्यांच्याकडे खुर्चीत बसवतात. त्यानंतर मी ज्या ज्या वेळी अशा प्रसंगाना कुणाच्या घरी गेलो तेव्हा कुणी खुर्चीत बसलं आहे का? हे बघायचो.” असा किस्सा रतन टाटांनी ( Ratan Tata ) राज ठाकरेंनी सांगितला होता. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राज ठाकरेंनी हा किस्सा कार्यक्रमात सांगितला.