शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केली आणि तेव्हापासून ते चर्चेचा विषय बनले. आपण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास हाताने नाही तर चपलेने मारले. तसेच एक नाही २५ वेळा मारले असे सांगणारे रवींद्र गायकवाड यांनी आपण माफी मागणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.  रवींद्र गायकवाड हे शांत स्वभावाचे आहेत परंतु गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा पारा अचानकपणे चढत असल्याचे जाणवत आहे अशी कबुली गायकवाड यांच्यासोबत अध्यपनाचे कार्य केलेल्या एका प्राध्यापकाने दिली.

उमरगा येथील एका महाविद्यालयामध्ये रवींद्र गायकवाड हे प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्या ठिकाणी ते वाणिज्य शाखेचे प्राध्यापक होते. जेव्हा विद्यार्थी चुकत त्यावेळी ते मुलांच्या थोबाडीत मारत असत परंतु ते एखाद्या कर्मचाऱ्याला मारत आहेत अशी कल्पना करणे अशक्य आहे. ही बाब धक्कादायक आहे असे ते म्हणाले.

रवींद्र गायकवाड यांना कॉलेजमध्ये सर्व जण रवी सर म्हणतात. रवी सर हे सरळमार्गी आणि शांत स्वभावाचे आहेत असे त्या प्राध्यापकांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. जर काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर त्यांचा पाराही लगेच चढतो असे देखील त्यांनी म्हटले. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे देखील त्यांच्या मनात चीड उत्पन्न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असे त्या प्राध्यापकाने सांगितले. रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात एकूण सात गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र सदनमध्ये कर्मचाऱ्याच्या तोंडामध्ये चपाती कोंबून रोजा मोडणाऱ्या अकरा खासदारांपैकी ते एक आहेत.