सायबर सेक्युरिटी क्षेत्रामध्ये गुगलने महत्त्वपूर्ण बजावावी अशी इच्छा माहिती तंत्रज्ञान आणि विधी मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याजवळ व्यक्त केली. भारताने डिजीटल क्रांती करण्याचा प्रण केला आहे. या पार्श्वभूमीवर देशामध्ये सायबर सेक्युरिटीचे आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारताला गुगलचे साहाय्य पाहिजे असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले.
जर सायबर सेक्युरिटीच्या क्षेत्रात गुगल काही योगदान करू शकत असेल तर त्याचा आम्हाला निश्चितच आनंद होईल असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. भारताने डिजीटल क्षेत्रात अनेक योजना लागू केल्या आहेत. तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन जास्तीत जास्त लोकांचे आयुष्य सुखकर बनविण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले.
सायबर सेक्युरिटीच्या क्षेत्रात भारताला काही आव्हाने आहेत परंतु येत्या काळात भारताची या प्रांतातही सत्ता असेल असे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले. भारताने डिजीटल क्षेत्रात केलेली प्रगती आश्चर्यकारक आहे असे ते म्हणाले. गुगल ही जितकी अमेरिकन कंपनी आहे त्याच प्रमाणात ती भारतीय देखील असल्याचे रवीशंकर यांनी म्हटले. भारतीय लोकांनी गुगलला मनापासून स्वीकारले आहे. तेव्हा तुम्ही भारतीयांसाठी सायबर सेक्युरिटीच्या क्षेत्रात काम करावे असे रवीशंकर प्रसाद म्हणाले. नोटाबंदीनंतर डिजीटल व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ते म्हणाले.
२०१५ मध्ये देशामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त सायबर हल्ल्याच्या घटना देशामध्ये घडल्या होत्या, अशी माहिती रवीशंकर प्रसाद यांनीच दिली होती. २०१६ मध्ये किती घटना घडल्या आहेत याबद्दल अद्याप माहिती उपलब्ध नाही. तेव्हा जर गुगलने भारताला या क्षेत्रात सहकार्य केले तर येणाऱ्या काळात हे आव्हान पेलणे तेवढे कठीण जाणार नाही.