मुंबई : महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी अपेक्षेनुरूप व्याजदरात अर्धा टक्क्याची वाढ केली. महिनाभरात झालेल्या दुसऱ्या तर दशकभरातील सर्वात मोठय़ा दरवाढीमुळे गृह, वाहन तसेच अन्य कर्जदारांवर मासिक हप्त्याचा भार वाढणार आहे. या निर्णयाच्या अपेक्षेने अनेक बँकांनी कर्ज व्याजदरात पतधोरणापूर्वीच वाढ केली.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर  शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीअंती व्याजदर वाढीचा हा निर्णय

एकमताने घेण्यात आला. रेपो दरातील सलग दुसऱ्या वाढीनंतरही, हे दर करोनापूर्व ५.१५ टक्क्यांच्या पातळीपेक्षा कमीच आहेत, असे गव्हर्नर दास यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. शिवाय करोना साथीच्या काळात स्वीकारलेल्या ‘परिस्थितीजन्य उदारते’च्या भूमिकेत बदल करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यातून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचेच त्यांनी सूचित केले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने महागाई दरातील वाढीचा अंदाज कायम ठेवत चालू आर्थिक वर्षांसाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.७ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. मात्र सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) अंदाज ७.२ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. महागाई दरासंबंधी अंदाजातील एका टक्क्याची वाढ ही युक्रेनमधील युद्धामुळे खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे असल्याचे नमूद करताना, ‘युद्धामुळे महागाईचेच जागतिकीकरण झाले आहे,’ असे ते म्हणाले.

संमिश्र प्रतिक्रिया..

रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या निर्णयामुळे गृहकर्ज महाग होणार असल्याने त्याचा घरांच्या विक्रीवर विपरित परिणाम होईल आणि गृहनिर्माण क्षेत्राला त्यातून मंदीच्या गर्तेत लोटले जाईल, अशी निराशाजनक प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.

सहकार बँकिंग क्षेत्रासंबंधी घोषणांचे सहकार वर्तुळातून स्वागत करण्यात आले. नागरी सहकारी बँकांच्या वैयक्तिक कर्जदारांसाठी गृहकर्जाच्या कमाल मर्यादेत दुपटीहून अधिक वाढ करण्यासह, या बँकांनाही घरपोच बँकिंग सुविधेची दारे खुली करण्यात आली आहेत.

दुसरीकडे, रोख राखीव प्रमाण (सीआरआर) हे ४.५० टक्के पातळीवर कायम ठेवले गेल्याचे वाणिज्य बँकांनीही स्वागत केले.

भांडवली बाजारातही बुधवारच्या व्यवहारात याचे संमिश्र पडसाद उमटले. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांक सलग चौथ्या सत्रात गडगडले तर बँकांच्या समभागांना मागणी मिळून त्यांनी मूल्य वाढ साधल्याचे दिसून आले.