आम्ही अजूनही भारताशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र, ही चर्चा कोणत्याही पूर्वअटींशिवाय झाली पाहिजे, असे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले. भारत-पाक यांच्यात सोमवारी दिल्ली येथे होऊ घातलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) पातळीवरील बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते इस्लामाबाद येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण कोणत्याही पूर्वअटींशिवाय भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले.
तत्पूर्वी शनिवारी दिल्ली येथे काश्मीरमधील फुटीरतावादी नेते साबीर शहा आणि त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात आल्यामुळे भारत-पाक यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. साबीर शेख हे सरताज
अझीझ यांच्या निमंत्रणावरून उद्याच्या एनएसए बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले होते. त्यामुळे अझीझ यांनी पत्रकारपरिषदेत हुरियत नेत्यांच्या अटकेबद्दल नाराजी व्यक्त करताना हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचे म्हटले. याशिवाय, काश्मीर हा दोन देशांदरम्यान प्रलंबित असलेला महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्यामुळे या बैठकीत काश्मीरचा अंतर्भाव केल्याशिवाय कोणतीही ठोस चर्चा होणे अशक्य असल्याचे अझीझ यांनी यावेळी सांगितले. तसेच भारताच्या ‘रॉ’ या गुप्तहेर संस्थेच्या पाकिस्तानातील कारवायांसदर्भात आमच्याकडे पुरावे असल्याचा दावा अझीझ यांनी केला.
भारत-पाक चर्चा अनिश्चित
शांतता राखणे ही भारत आणि पाकिस्तान यांची संयुक्त जबाबदारी आहे. सध्यातरी भारताकडून उद्याची चर्चा रद्द झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र, थोड्याचवेळात होणाऱ्या पत्रकारपरिषदेत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज काय भूमिका घेतील, यावर आमचा पुढील निर्णय अवलंबून असल्याचे अझीझ यांनी सांगितले. पाकिस्तान हुरियत नेत्यांना चर्चेत सहभागी करावे, या अटीवर अडून बसल्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. परंतु, फक्त या कारणामुळे भारताकडून उद्याची एनएसए बैठक रद्द केली जाणे, कितपत योग्य आहे, असा सवालही अझीझ यांनी पत्रकारपरिषदेत उपस्थित केला.

या पत्रकारपरिषदेत अझीझ यांनी मांडलेले अन्य काही महत्त्वाचे मुद्दे:

* गतवर्षी भारताने चर्चा रद्द केली.
* उफा करारादरम्यान करारादरम्यान सर्व विषयांवर चर्चा करण्याचे निश्‍चित झाले होते.
*काश्‍मीरचा मुद्दा एवढा महत्वाचा नसेल तर भारतीय सीमेवर मोठ्या प्रमाणातील लष्कर का?
* भारताने गेल्या दोन महिन्यात १०० वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.
* भारताने पाकिस्तानवर केलेले सर्व आरोप चुकीचे.
* भारताने उफामधील कराराचा चुकीचा अर्थ काढला.
* आता चर्चा कधी करायची हे भारतानेच ठरवावे. आम्ही चर्चेसाठी तयार.