Red Fort Robbery in Jain Event : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ला संकुलात एक मोठी चोरीची घटना घडली आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. जैन समुदायाच्या एका कार्यक्रमादरम्यान एका चोराने लाल किल्ल्यातील तब्बल एक कोटी रुपये किमतीचा सोन्याचा रत्नजडित कलश (पवित्र पात्र) लंपास केला आहे. ७६० ग्रॅम सोन्यापासून बनवण्यात आलेला व १५० ग्रॅमचे हिरे जडवलेला, तसेच माणिक व पाचूंनी सजवलेला हा कलश प्रसिद्ध उद्योगपती सुधीर जैन यांनी दिला होता.

लाल किल्ल्यात जैन समुदायाचा एक धार्मिक कार्यक्रम चालू असून ९ सप्टेंबरपर्यंत तो चालू राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान दैनंदिन प्रार्थनेसाठी सदर कलश वापरला जात होता. काही धार्मिक विधींसाठी या कलशाचा वापर केला जात होता.

या आठवड्याच्या सुरुवातीला लाल किल्ल्यात ही चोरी झाली आहे. लाल किल्ल्यात नुकताच दशलक्षण महापर्व समारंभ देखील पार पडला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्वागत समारंभावेळी चोराने डाव साधला

या चोरीच्या घटनेची माहिती देताना पोलीस म्हणाले, कार्यक्रमाच्या स्वागत सोहळ्यावेळी ही चोरी झाली. मान्यवरांचं स्वागत चालू असताना चोराने संधी साधली आणि सोन्याचा कलश लंपास केला. स्वागत समारंभ पार पडल्यानंतर औपचारिक कार्यक्रम सुरू झाल्यावर उपस्थितांच्या लक्षात आलं की कलश मंचावरून गायब झाला आहे. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.

या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी व आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चित्रीत करण्यात आलेलं फूटेज तपासलं, ज्यामध्ये आरोपी दिसत आहे. आरोपी जैन साधूंच्या वेशात वावरत असल्याचं आणि तो मंचावरून एक काळ्या रंगाची बॅग उचलताना दिसत असल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे.

आरोपीच्या मागावर दिल्ली पोलिसांची पथकं रवाना

चोराच्या सुरुवातीपासूनच्या संशयास्पद हालचाली वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्यै कैद झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की संशयिताची ओळख पटली असून लवकरच तो गजाआड झालेला दिसेल. आरोपीला जेरबंद करण्यासाठी दिल्ली पोलिसांची काही पथकं रवाना करण्यात आली असून पुढच्या काही दिवसांत पोलीस त्याच्या मुसक्या आवळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

लाल किल्ल्यात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेल्या या वास्तूच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. केवळ युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ आहे म्हणून नव्हे तर देशाच्या राजकारणातही या वास्तूला महत्त्व आहे. कारण देशाचे पंतप्रधान दर वर्षी स्वातंत्र्य दिनी (१५ ऑगस्ट) याच लाल किल्ल्यावर देशाचा राष्ट्रध्वज फडकावून देशाला संबोधित करतात.