Red Fort Delhi Explosion Updates: सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय यंत्रणा, तपास यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या स्फोटामागे नेमकं कोण आहे? स्फोट नेमका कसा झाला? स्फोट घडवलेली कार घटनास्थळापर्यंत कशी पोहोचली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. पण त्यादरम्यान एक Reddit Post सध्या व्हायरल होत आहे. एका १२वीच्या विद्यार्थ्याची ही पोस्ट असल्याचा दावा खुद्द त्या पोस्टमध्येच करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्फोटाच्या चार तास आधी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामुळे आता स्फोटाच्या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
नेमकं काय घडलं दिल्लीत?
राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे हादरली. संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ एका ह्युंदाई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर तिथे मोठा आगीचा भडका उडाला. त्यामुळे या कारच्या आसपास उभ्या असलेल्या इतर काही वाहनांनादेखील आग लागली. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे ऐन संध्याकाळी या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच हा स्फोट झाल्यामुळे मोठी जीवितहानी झाली.
दरम्यान, एकीकडे स्फोटासंदर्भात तपास वेग धरत असताना दुसरीकडे काहीतरी असामान्य घडत असल्याचं शंका व्यक्त करणारी पोस्ट स्फोटाच्या तीन तास आधी म्हणजे संध्याकाळी ४ च्या सुमारास Reddit वर शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये दिल्लीच्या लाल किल्ला परिसर व त्याजवळच्या मेट्रो स्थानक परिसरात काहीतरी असामान्य घडत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं.
काय आहे Reddit Post मध्ये?
या पोस्टमध्ये आपण १२वीचे विद्यार्थी असल्याचं संबंधित युझरनं लिहिलं आहे. “मी आत्ताच शाळेतून घरी परत आलो आहे (इयत्ता १२वी). मी खोटं बोलत नाही, पण लाल किल्ला आणि मेट्रोच्या भागात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पोलीस, लष्कराचे जवान आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. मी अजिबात विनोद करत नाहीये. मी परत येत असताना मेट्रोमध्येही नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात लष्कराचे जवान पाहिले. काहीतरी घडतंय का? आज काही आहे का?” असा प्रश्न या युझरने पोस्टमध्ये विचारला आहे.
आता ही पोस्ट व्हायरल होत असून पोस्टनंतर फक्त तीन तासांत दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात कारमध्ये स्फोट झाला. ही पोस्ट अडीच हजारांहून जास्त युझर्सनी रीशेअर केली आहे. तसेच, त्यावर कमेंटही येऊ लागल्या आहेत. “अनाहूतपणे या मुलाने आपल्याला इशारा देण्याचा प्रयत्न केला होता”, अशी कमेंट एका युझरनं केली आहे. मात्र, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित युझरनं आपलं अकाऊंटच डिलीट केल्याचं समोर आलं आहे. या पोस्टवर इतर नेटिझन्सकडून तशा प्रकारच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत.
