जगभरात सध्या दोन परस्पर विरोधी गोष्टींची कमालीची चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे वेगवेगळे देश मोठा आर्थिक विकास साध्य केल्याचे दावे करत आहेत. खुद्द भारतातदेखील जगभरातली तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल होत असल्याचं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे अनेक मोठमोठ्या कंपन्यादेखील नोकरकपात करताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणावर तरुण बेरोजगार आहेत. या पार्श्वभूमीवर एका मोठ्या कंपनीत झालेल्या नोकरकपातीनंतर संबंधित कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर यासंदर्भात केलेली सविस्तर पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.
आयटी, तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमधील मोठमोठ्या कंपन्या सध्या नोकरकपातीचा मार्ग स्वीकारताना दिसत आहेत. अर्थातच, कंपनीच्या आर्थिक स्थितीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशाच एका कंपनीतून कामावरून काढून टाकले गेल्याचा अनुभव एका ऑनलाईन युजरने रेडइट या सोशल मीडिया साईटवर शेअर केला आहे. अर्थात, यानंतर दोन महिन्यांनी चांगली नोकरी लागल्याचंही त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, त्याआधी आपली नोकरी जाणार हे कळलं तेव्हा नेमक्या काय भावना होत्या, याविषयी त्याने सविस्तर माहिती दिली आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.
काय आहे या पोस्टमध्ये?
या पोस्टमध्ये सदर कर्मचाऱ्याने त्याची आपबीती सांगितली आहे. “आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना दुपारी २ च्या सुमारास एक इमेल आला. त्यात लिहिलं होतं की संध्याकाळी ६ वाजता कंपनीत नोकरकपात होणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यासंदर्भात ईमेलवर माहिती दिली जाईल. त्या दिवशी मी माझ्या बॉससोबत संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांपर्यंत काम केलं. आमचं काम संपलं तेव्हा माझ्या बॉसने त्या दिवशीच्या कामाबद्दल पुढच्या आढवड्यात आढावा घेणारी मीटिंगही ठरवली. ते पाहून मला थोडा आधार आणि आशा वाटू लागली. संध्याकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी मला मेल आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता मला ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“दुसऱ्या दिवशीच्या त्या मीटिंगपर्यंतचा वेळ मी कसा काढला माझं मला माहिती. तो काळ प्रचंड तणावपूर्ण आणि उद्ध्वस्त करून टाकणारा होता. दुसऱ्या दिवशी ११ वाजेपर्यंतचे ते तास अत्यंत वाईट गेले. मला छातीत दुखू लागल्याचं जाणवत होतं. मला भीती वाटत होती की मी चक्कर येऊन खाली कोसळतो की काय? माझ्या डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले”, असंही या युजरनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“त्या मीटिंगमध्ये नोकरी गेल्याचं समजलं, पण…”
दरम्यान, दुसऱ्या दिवशीच्या मीटिंगपर्यंत प्रचंड तणाव आल्याचं या युजरनं लिहिलं आहे. मीटिंगनंतर काय घडलं, हेही त्यानं नमूद केलं आहे. “ती मीटिंग झाल्यानंतर लगेचच मला खूप निवांत वाटू लागलं होतं. जणूकाही प्रचंड मोठा भार डोक्यावरून हलका झाला होता. मला याची जाणीव झाली होती की आपल्याबाबत कंपनीनं निर्णय घेतला आहे आणि आता आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे”, असं या युजरनं म्हटलं आहे.
सारंकाही संपल्यासारखं वाटत होतं, पण खरंतर तसं नव्हतं!
दरम्यान, नोकरी गेल्यानंतर करायचं काय या प्रचंड मोठ्या विवंचनेत अडकलेल्या या युजरनं त्या परिस्थितीचा कसा सामना केला हेही पोस्टमध्ये लिहिलं आहे. “नोकरी गेल्यानंतर माझा व्हिसा फक्त तीन आठवडे टिकणार होता. मला त्या तीन आठवड्यांमध्येच या परिस्थितीवर मार्ग काढायचा होता, नाहीतर मला देश सोडावा लागला असता. त्याचदरम्यान मला एका कंपनीतून नोकरीसाठी मुलाखतीचं बोलावणं आलं. मी या मुलाखतीच्या तयारीसाठी सारंकाही पणाला लावलं”, असं या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
“जवळपास दोन आठवड्यांच्या कठोर तयारीनंतर माझ्या प्रयत्नांना यश आलं. मला नोकरी मिळाली. विशेष म्हणजे आधीच्या नोकरीपेक्षा तब्बल २१० टक्के जास्त पगार देणारी नोकरी मला मिळाली. माझ्या व्हिसाबाबतही या कंपनीने बरीच मदत केली. हे सगळं जर मला शक्य होऊ शकतं, तर तुम्हालाही शक्य होणारच! खंबीर राहा, धीर धरा. कठोर मेहनतीचं फळ नेहमी मिळतंच. अशा नोकरकपातीनंतरच्या तुमच्या अशा खडतर प्रवासासाठी शुभेच्छा”, असं म्हणत या युजरनं नोकरकपातीनंतर मानसिक तणाव निर्माण झालेल्या लोकांना खचून न जाता परिस्थितीचा सामना करण्याचा सल्ला दिला आहे.