बळींची संख्या २६९; मदतीचा ओघ
पूरग्रस्त चेन्नई शहरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून दूरसंचार, रेल्वेसेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे. रस्ते वाहने धावण्यायोग्य स्थितीत आले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. चेन्नईतील पावसाने आतापर्यंत २६९ बळी घेतले असून, मंगळवारी चेन्नईतील परिस्थिती बिकट झाली होती. पुरामुळे रस्ते वाहतूक, रेल्वेसेवा विस्कळीत झाली. वीजपुरवठा खंडित झाला व विमानतळावर पाणी घुसल्याने विमान उड्डाणे रद्द करावी लागली. पुरामुळे लाखो लोक अडकून पडले होते.
कोट्टपुरम, मुडीचूर, पल्लीकरनाई येथे अजूनही पाणी साठलेले असून लोकांनी इमारतींच्या वरच्या मजल्यावर आश्रय घेतला आहे. दूध व पाण्याचा पुरवठा अपुराच असून, एटीएमच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तामिळनाडू सरकारने म्हटले आहे, की दोन दिवसांत इंधनाचा पुरवठा सुरू होईल व उद्या रविवार असला तरी बँका उघडल्या जातील. दक्षिण व उत्तर चेन्नई दरम्यान काही गाडय़ा सोडल्या असून त्यातून मदत साहित्य नेले जात आहे. तांबारमसह अनेक ठिकाणी लँडलाइन सेवा सुरू झाली असून मोबाइल सेवाही पूर्ववत होत आहे. रात्री चेन्नईत पाऊस झाला, पण सकाळी त्याचा वेग कमी झाला. भाजीपाल्याचे भाव वाढले असून, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमीच आहे. चेन्नई विमानतळावर तांत्रिक व मदत वाहून नेणारी विमान उड्डाणे सुरू झाली आहेत.
सिंगापूरची मदत
चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी सिंगापूरने ७५ हजार डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. सिंगापूरचे मंत्री विवियन बाळकृष्णन यांनी मुख्यमंत्री जयललिता यांना पत्रही पाठवले आहे. पुरामुळे झालेल्या प्राणहानीने व्यथित असल्याचे सांगून त्यांनी ७५ हजार डॉलर्सची मदत जाहीर केली. राज्यात लवकरच जनजीवन सुरळीत होईल अशी आशा वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.
लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली, प्रशासनाला गरज असेल तोपर्यंत लष्कराची मदत सुरू राहील असे त्यांनी सांगितले. लष्कराने ५५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून, आणखी वैद्यकीय पथके तसेच सामग्री उपलब्ध करून दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तांबारम, उरपक्कम, मणीवक्कम, मुडीचूर व इतरत्र लष्कराच्या ५० पथकांनी मदतकार्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नौदलाचे मदतकार्य
नौदलाचे लेफ्टनंट कमांडर अभिनव यांनी सांगितले, की नौदल दिनी लोकांना वाचवण्याची संधी मिळाली, त्यामुळे हा दिन वेगळय़ा रूपात साजरा होत आहे याचा आनंद आहे. आयएनएस राजाली नौकेने ६०० जणांची सुटका केली. अराकोरम नौदल तळावरून मदतकार्याची मोहीम राबवण्यात आली. १९७१च्या भारत-पाक युद्धात याच दिवशी ट्रायडंट मोहीम राबवण्यात आली होती. त्याच्या स्मरणार्थ ४ डिसेंबर हा नौदलदिन साजरा केला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relif work in chennai
First published on: 06-12-2015 at 02:32 IST