रेमडेसिविर हे विषाणूरोधक औषध कोविड-१९च्या रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ उपलब्ध व्हावे म्हणून त्याचे उत्पादन येत्या १५ दिवसांत दुप्पट, म्हणजे दररोज सुमारे ३ लाख कुप्यांपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. देशात रेमडेसिविरचे उत्पादन वाढवण्याची प्रक्रिया याआधीच सुरू झाली आहे, असे ट्वीट रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सध्या आम्ही दिवसाला १.५ लाख कुप्या तयार करतो. येत्या १५ दिवसांत हे प्रमाण दिवसाला ३ लाख कुप्या, म्हणजे दुप्पट केले जाईल,’ अशी माहिती मंडाविया यांनी ट्विटरवर दिली. सरकारने २० संयंत्रांना या औषधाचे उत्पादन करण्याची परवानगी दिली असून, तेथे रेमडेसिविरचे उत्पादन होत असल्याचेही ते म्हणाले.

रेमडेसिविरचे जास्तीत जास्त उत्पादन करण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. औषध उत्पादक कंपन्यांनी या औषधाच्या किरकोळ किमती कमी केल्या असून त्याचा रुग्णांचा फायदा होईल, असे मंत्र्यांनी सांगितले.

काळाबाजार करणाऱ्या तिघांना अटक

बेंगळुरू : करोनाची दुसरी लाट शिखरावर असताना रेमडेसिविर या इंजेक्शनची साठेबाजी व काळा बाजार केल्याच्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ते एक कुपी १० हजार ५०० रुपयांना विकत होते. बेंगळुरूचे सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले, की रेमडेसिविर इंजेक्षनची साठेबाजी व काळा बाजार करण्याचे प्रकरण सामोरे आल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने बेंगळुरूत तपास मोहीम राबवून तिघांना अटक केली. राजेश, शाकीब व सोहेल यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी माडीवाला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडे या रेमडेसिविर इंजेक्शनचा बेकायदेशीर साठा होता व ते त्याची विक्री १० हजार ५०० रुपयांना करीत होते. हा दर कमाल किमतीपेक्षा खूप अधिक होता.

कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्यांना अटक करण्यात यावी असे आदेश वरिष्ठ पोलिस  अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले होते.  अनेक रुग्णालयांनी प्राणवायूची कमतरता व रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. स्वस्तिक रुग्णालयाचे संस्थापक डॉ. विजय राघव रेड्डी यांनी समाजमाध्यमावर दृकश्राव्यफीत जारी केली होती. त्यात प्राणवायू उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याचे म्हटले होते. प्राणवायू टाक्या भरून देणाऱ्या कंपन्या हा प्राणवायू कारखान्यांना पुरवत असल्याच्या तक्रारी होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remedicivir plans to double production akp
First published on: 19-04-2021 at 00:12 IST