काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुजरात या ठिकाणी केलेलं भाषण आणि त्या भाषणातलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. जुनागढ जिल्हा काँग्रेस अध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबीरात ते म्हणाले पेटीतले सडके आंबे बाजूला करा नाहीतर आंब्याची सगळी पेटी खराब होईल. काँग्रेस पक्षाला नेमकं हेच केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पक्षातले सडके आंबे बाहेर फेका नाहीतर..
मल्लिकार्जुन खरगे गुजरातमधल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना म्हणाले इंडियन एक्स्प्रेसमध्ये छापून आलेल्या एका अहवालाकडे नीट लक्ष द्या. यामध्ये सांगण्यात आलं आहे की पक्षाच्या ४१ पैकी १९ शहर आणि जिल्हा या ठिकाणी आपली पिछेहाट होते आहे. पक्षातले सडके आंबे बाहेर फेका. म्हणजे पूर्ण पेटी खराब होणार नाही. बूथ स्तरावर पक्ष मजबूत करा. देशात लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला काम करावं लागेल. अनुशासन, समर्पण, वैचारिकता या सगळ्या गोष्टींसह आपल्याला पुढे जायचं आहे. गुजरातमध्ये जे काँग्रेस नेते तडजोडी करतात, ज्यांना चांगली कामगिरी करता येत नाही अशा लोकांना वेळीच बाजूला करा. आपल्याला आपला पक्ष गुजरातमध्ये मजबूत करावा लागेल. तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, पक्ष आपोआप चांगल्या पद्धतीने उभा राहिल. गुजरातमध्ये काँग्रेसला आपली ताकद वाढवायची आहे असंही मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलं आहे.
मल्लिकार्जुन खरगेंनी उल्लेख केलेल्या रिपोर्टमध्ये काय?
मल्लिकार्जुन खरगेंनी ज्या रिपोर्टचा उल्लेख केला त्या रिपोर्टमध्ये ४१ पैकी १९ ठिकाणी काँग्रेसची पिछेहाट होते आहे. आत्ताच जे करायचं आहे ते करा. कारण आत्ताच आपल्याकडे वेळ आहे असंही खरगेंनी म्हटलं आहे. मूळापासून पक्ष मजबूत करा. शिबीरात पहिल्या दिवशी १०० टक्के उपस्थिती, दुसऱ्या दिवशी ९० टक्के उपस्थिती आणि तिसऱ्या दिवशी ८० टक्के उपस्थिती असं आता चालणार नाही. काँग्रेसची विचारधारा तुम्ही अंगिकारली आहे तर तुम्हाला समर्पण भावनेने काम करावं लागेल, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.