दिल्लीतल्या अकबर रोडला दिवंगत सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं नाव देण्याची मागणी दिल्लीतल्या भाजपाच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांनी केली आहे. याबद्दल त्यांनी नवी दिल्ली नगरपरिषदेला पत्रही लिहिलं आहे. अकबर हा आपल्यावर आक्रमण केलेला राजा होता, त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणं अधिक योग्य आहे, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

याविषयी नवी दिल्ली नगरपरिषदेला लिहिलेल्या पत्रात भाजपाचे मीडिया विभागाचे प्रमुख नवीन कुमार जिंदाल म्हणतात, तुम्हाला ही विनंती आहे की सीडीएस जनरल बिपिन रावत यांची आठवण आपण कायमस्वरुपी जपायला हवी. त्यासाठी दिल्लीच्या अकबर रोडला जनरल बिपिन रावत यांचं नाव द्या. ही जनरल रावत यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अकबर हा आक्रमणकर्ता होता, त्यामुळे त्याच्याऐवजी या रस्त्याला जनरल रावत यांचं नाव देणंच योग्य ठरेल.

नवी दिल्ली नगरपरिषदेचे उपाध्यक्ष सतिश उपाध्याय यांनी सांगितलं की, त्यांचं या मागणीला समर्थन आहे. मात्र हा निर्णय पूर्णतः नवी दिल्ली नगरपरिषदेचा आहे. तसंच आपण सोशल मीडियावरही ही मागणी जोर धरल्याचं पाहत आहोत, असंही उपाध्याय यांनी सांगितलं. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नगरपरिषद या गोष्टीचा विचार करेल असंही ते म्हणाले.

ह्या रस्त्याचं नाव बदलण्याची मागणी पूर्वीही झाली होती. मंत्री व्ही. के. सिंग यांनी या आधी अकबर रोडचं नाव बदलून महाराणा प्रताप रोड करावं अशी मागणी केली होती. हा रस्ता याआधीही वादात सापडला होता. ऑक्टोबरमध्ये या रस्त्याचं नाव असलेल्या फलकाचं नुकसान करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सम्राट हेमू विक्रमादित्य मार्ग असे फलकही लावण्यात आले होते. हिंदू सेनेने या कृत्याची जबाबदारी घेतली होती.