भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचं अपहरण झाल्याचं वृत्त खोटं असल्याचं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. जवानाचं अपहरण झाल्याची बातमी आल्याने एकच खळबळ माजली होती. पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर जम्मू बस स्थानकावर झालेला ग्रेनेड हल्ला यामुळे आधीच जम्मू काश्मीरमध्ये तणाव असताना जवानाचं अपहरण झाल्याचं वृत्त चिंताजनक होतं. मात्र अपहरण झालेलं नसून मोहम्मद यासीन सुरक्षित असल्याचं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे की, काही प्रसारमाध्यमांमध्ये लष्कर जवान मोहम्मद यासीन यांचं बडगाम येथून अपहरण झाल्याचं वृत्त देण्यात आलं असून ते चुकीचं आहे. ते सुरक्षित आहेत. कृपया कोणतेही अंदाज व्यक्त केले जाऊ नयेत असं आवाहनही संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे.

याआधी मोहम्मद यासीन यांचं शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांकडून राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याचं वृत्त आलं होतं. जवान मोहम्मद यासीन हे भारतीय लष्करातील जाकली युनिटचे सदस्य आहेत. बडगाम जिल्ह्यातील क्वाझिपोरा चाडुरा गावचे ते रहिवासी आहेत. शुक्रवारी काही दहशतवादी त्यांच्या घरात घुसले आणि ते यासीन यांना आपल्यासोबत घेऊन गेले, अशी तक्रार या जवानाच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली होती. अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर तात्काळ शोध पथके रवाना करण्यात आली होती. मात्र संरक्षण मंत्रालयाने अपहरणाचं वृत्त फेटाळलं आहे.