वॉशिंग्टन : अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे अध्यक्षपद तिसऱ्या दिवशीही रिक्त राहिले. मतदानाच्या अनेक फेऱ्यांनंतरही रिपब्लिकन नेते केव्हिन मॅकार्थी यांना पुरेशी मते मिळवता आली नाहीत. मतदानाच्या सातव्या, आठव्या, नवव्या, दहाव्या व अकराव्या फेरीत मॅकार्थी पुरेशी मते मिळवण्यात अपयशी ठरल्याने प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष निवडीचा प्रक्रियेत तणाव निर्माण झाला आहे. १०० वर्षांपूर्वी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षपदाची निवडणूक अशी लांबली होती, तिलाही सध्याच्या वादग्रस्त निवडणुकीने आता मागे टाकले आहे.

डेमोक्रॅटिक पक्ष सदस्यांच्या विरोधाला न जुमानता रिपब्लिकन सदस्यांनी या निवडणुकीचा निकाल लावण्यासाठी सत्र स्थगित करून शुक्रवारी पुन्हा सत्र घेण्यासाठी मतदान केले. मॅकार्थी यांचे समर्थक आणि विरोधकांतील गदारोळामुळे सभागृहाचे नवे सत्र सुरू होऊ शकले नाही. रिपब्लिकन पक्षाचे सदस्य व मॅकार्थीचे विरोधक मॅट गेट्झ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे प्रतीकात्मकपणे मतदान केल्यावर सभागृहात विचित्र स्थिती निर्माण झाली. याकडे रिपब्लिकन पक्षांतर्गत मोठी फूट असल्याचे मानले जात आहे. ट्रम्प यांच्या नावाने मतदान झाल्यावर अवघ्या सभागृहात एकच हशा पिकला.

मॅकार्थीच्या समर्थकांनी या निवडणुकीत बहुमत मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक नवीन प्रस्ताव दिले आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांशी वाटाघाटी सुरू आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो नेगस यांनी या सभागृहाला विश्वासार्ह नेत्याची गरज असल्याचे सांगून, त्यांच्या पक्षाच्या हकीम जेफरीज यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले आहे. न्यूयॉर्कच्या जेफरीज यांना प्रत्येक फेरीत चांगली मते मिळाली परंतु पुरेशा संख्येने सदस्यांचे समर्थन त्यांना मिळाले नाही. मॅकार्थी हे दुसऱ्या स्थानी असून, या पदासाठी पुरेशी मते मिळवावीत अथवा प्रतिनिधी गृहाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी या निवडणुकीतून माघार घ्यावी, असे दोन पर्याय त्यांच्यासमोर असल्याने त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.

काही वाटाघाटी सकारात्मक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मॅकार्थी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याविषयी ठाम विश्वास व्यक्त केला नाही. मात्र, त्यांना सुरुवातीला पाठिंबा व मतदान करण्यास नकार दोणाऱ्या काही जणांशी वाटाघाटी यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहे. मॅकार्थीनी सांगितले, की यासंदर्भात सकारात्मक चिन्हे दिसत आहेत. या पदाची लांबलेली निवडणूक व गोंधळाबद्दल विचारले असता, एखाद्या गोष्टीचा प्रारंभ कसा झाला यापेक्षाही त्याचा शेवट तुम्ही कसा करता, हे महत्त्वाचे असते, असे मॅकार्थीनी सांगितले.