रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक संभाव्य उमेदवारांनी वादविवादात एकमेकांवर कडवट टीका केली असली तरी त्यांनी सध्याचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या इस्लामिक स्टेट व इराणच्या अणु कार्यक्रमावरील धोरणांवर एकमुखी टीका केली आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या सतरा अध्यक्षीय उमेदवारांपैकी काल फॉक्स न्यूज वाहिनीवर पहिला वादविवाद ओहियोतील क्लेव्हलँड येथे झाला तेथे या उमेदवारांनी इराण, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया, स्थलांतर व अर्थव्यवस्था या मुद्दय़ांवर ओबामांवर कडक टीका केली. स्थावर मालमत्ता सम्राट डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन उमेदवारास पाठिंबा देण्यातून माघार घेतली. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकी नेते खोडसाळ असून आपण डेमोक्रॅट नेत्या हिलरी क्लिंटन यांच्यासह अनेक उमेदवारांना निधी दिला आहे. सिनेटर रँड पॉल यांच्याशी व वादविवाद नियंत्रकांशी त्यांचे वाद झाले. आता राजकीय चुका दुरुस्त करण्याची वेळ राहिलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
फ्लॉरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश यांनी ट्रम्प यांच्यावर विभाजनवादी भाषा वापरल्याचा आरोप केला. बुश यांनी असा इशारा दिला की, अशा शाब्दिक भांडणांमुळे रिपब्लिकन पक्षाला अध्यक्षपद जिंकण्यासाठी फायदा होणार नाही. थेट प्रक्षेपण होत असलेल्या या वादविवादात या नेत्यांनी एकमेकांशी कडवी झुंज दिली. लाखो लोकांनी ती पाहिली. इराणबरोबरचा अणुकरार २०१६ मधील निवडणुकीत अध्यक्षपद मिळाल्यास रद्द करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. बुश यांनी सांगितले की, इराण करार थोपवला पाहिजे कारण इराणचे जे मुल्ला आहेत त्यांच्या हातांना रक्त लागलेले आहे. इसिसलाही प्रतिकार केला पाहिजे. ट्रम्प यांनी असा आरोप केला की, आपल्या अध्यक्षांना कशाचा थांगपत्ता नाही, ते अकार्यक्षम आहेत. इराणबरोबर आपण करार केला, आपल्याला आपले कैदी परत हवे आहेत, आपल्याला अनेक गोष्टी हव्या आहेत पण आपल्याला काही मिळाले नाही. आपण त्यांना १५० अब्ज डॉलर्स देत आहोत. इराण हा जर समभाग मानला तर तुम्ही लोक तो आताच विकत घ्या कारण त्याचा चौपट फायदा मिळेल, पण इराणमधील स्थिती वाईट आहे, तो देश जगातील अनेक भागांच्या नष्टचर्यास कारणीभूत ठरत आहे.
विस्कॉन्सिनचे गव्हर्नर स्कॉट वॉकर यांनी सांगितले की, ओबामा-क्लिंटन नीतीच्या मागे दडून नेतृत्व करीत आहोत. अमेरिका हा महान देश आहे, त्याने पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी. आपल्याला केवळ इस्रायल हा मित्र नको तर पर्शियन आखातातील देश
आपले मित्र असावेत. रिपब्लिकन पक्षाच्या सतरा उमेदवारांनी फॉक्स न्यूजवर बाजू मांडली.