रिपब्लिकन पक्षाशी संबंधित पन्नास राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले तर ते सर्वात बेदरकार किंवा बेपर्वा अध्यक्ष ठरतील असे मत व्यक्त केले आहे. निक्सन ते बुश यांच्या काळात सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या विरोधात लेटर बॉम्ब टाकला आहे.

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार असलेल्या ट्रम्प यांच्यात चारित्र्यात्मक मूल्ये नाहीत व स्वनियंत्रणही नाही असे सांगून या गटाने म्हटले आहे, की अध्यक्ष व अमेरिकी अण्वस्त्रागाराचा कमांडर इन चीफ होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारा ट्रम्प यांच्यासारखा नेता घातकी गुणांचा आहे. आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना मत देणार नाही. अंतर्गत सुरक्षा प्रमुख, गुप्तचर संचालक, माजी अध्यक्षांचे सल्लागार, माजी व्यापार दूत यांनी एक खुले पत्र जारी केले असून त्यात ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प निवडमून आले तर नैतिक अधिकारात अमेरिका कमकुवत होईल. परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत ट्रम्प हे अध्यक्ष व कमांडर इन चीफ बनण्याच्या लायकीचे नाहीत. ते घातक अध्यक्ष ठरतील व देशाची सुरक्षा व कल्याण धोक्यात आणतील. ट्रम्प यांच्यात चारित्र्यमूल्ये नाहीत, अध्यक्ष होण्यासाठीची मूल्यपात्रता नाही. मुक्त जगाचा नेता होण्यासाठी लागणारे अमेरिकेचे नैतिक अधिष्ठान त्यांच्यामुळे कमी होईल. या पत्रावर अनेक माजी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, त्यांनी रिचर्ड निक्सन ते जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या काळात काम केलेले आहे. देशाची राजनैतिक आव्हाने, देशहित, परदेश धोरणातील लोकशाही मूल्ये यांची जाण ट्रम्प यांना नाही, शिवाय त्यांना राज्यघटनेबाबत फार माहिती नसून त्यावर त्यांचा विश्वासही नाही. ट्रम्प यांनी स्वशिक्षणाचा प्रयत्नच केलेला नाही असे सांगून पत्रात म्हटले आहे, की ट्रम्प यांना अमेरिकेची राज्यघटना व संस्था यांचे मूलभूत ज्ञान नाही. धार्मिक सहिष्णुता, वृत्तपत्र स्वातंत्र्य व स्वतंत्र न्यायव्यवस्था याबाबत त्यांना जाणीव नाही. ते व्यक्तिगत टीका सहन करू शकत नाहीत, त्यांच्या लहरी वर्तनाने त्यांनी शेजारी मित्र देशांना भयचकित केले आहे.

ट्रम्प यांनी या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे, की ज्यांनी हा पत्र लिहिण्याचा उद्योग केला आहे ते अमेरिकेतील अपयशी प्रतिष्ठित आहेत व त्यांना सत्ता हाती ठेवायची आहे, त्यांनीच जग असुरक्षित केले आहे व गोंधळ निर्माण केला आहे. ट्रम्प यांना दुसरा धक्का रिपब्लिकन सिनेटर सुसान कॉलिन्स यांनी दिला असून त्यांनी सांगितले, की ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी आवश्यक संयम व अंदाज नसल्याने त्यांना आपण मत देणार नाही. त्या माइन येथील सिनेट प्रतिनिधी आहेत. हा सहज घेतलेला निर्णय नाही. मी रिपब्लिकन पक्षात बराच काळ आहे, पण ट्रम्प यांच्यात त्या पक्षाची ऐतिहासिक मूल्ये व समावेशक दृष्टिकोन दिसत नाही व देशातील भेद मिटवण्याची, त्यावर फुंकर घालण्याची त्यांची ताकद नाही. सीआयएचे माजी संचालक मायकेल मॉरेल यांनी असा आरोप केला होता, की ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे हस्तक आहेत. सीआयएचे माजी संचालक मायकेल हेडन, अमेरिकेचे माजी व्यापार दूत कार्ला हिल्स, माजी राजदूत रॉबर्ट ब्लॅकवील, निअर इस्ट अफेअर्सचे माजी सहसंचालक व राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे सदस्य रिचर्ड फाउंटेन, टॉम रिज, मायकेल शेरटॉफ, रॉबर्ट झोलिक, एरिक एडेलमन, डिक चेनी यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.

बंडखोर मॅकम्युलिन रिंगणात

अमेरिकेतील निवडणुकीत रंगत आणताना सीआयएमध्ये दहशतवाद विरोधी विभागात काम केलेले माजी अधिकारी व रिपब्लिकन बंडखोर इव्हान मॅकम्युलिन यांनी व्हाइट हाऊसच्या म्हणजे अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प किंवा हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा चांगल्या अध्यक्षांची गरज आहे असे त्यांनी सांगितले. मॅकम्युलिन (वय ४०) हे संघराज्य निवडणूक आयोगाकडे अध्यक्षीय उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. पण त्यांची जिंकण्याची शक्यता फार कमी आहे.