पीटीआय, अहमदाबाद
नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातील बीबीसीच्या वृत्तपटात दाखवण्यात आलेल्या ‘बनावट’ निष्कर्षांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारा ठराव गुजरातमधील भाजपचे आमदा विपुल पटेल हे शुक्रवारी विधानसभेत मांडणार आहेत. २००२ सालच्या गोधरा घटनेनंतरच्या दंगलींसाठी तत्कालीन राज्य सरकारला दोषी ठरवण्याचा या वृत्तपटाद्वारे ‘पुन्हा एकदा’ प्रयत्न करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे.
बीबीसीचा हा वृत्तपट म्हणजे भारताची जगभरातील प्रतिमा डागाळण्याचा ‘खालच्या स्तरावरील प्रयत्न’ होता, असे प्रस्तावित ठरावात म्हटले जाण्याची शक्यता आहे.‘भारत हा लोकशाहीवादी देश असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा त्याच्या घटनेचा गाभा आहे, मात्र एखादे वृत्तमाध्यम अशा स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू शकते असा त्याचा अर्थ नाही’, असे विधानसभा सचिवालयाने मंगळवारी उपलब्ध करून दिलेल्या प्रस्तावित ठरावाच्या गोषवाऱ्यात म्हटले आहे.