लंडन : भारताशी मुक्त व्यापार करार (एफटीए) करण्याबाबत ब्रिटन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केला. प्रतिस्पर्ध्याविरुद्ध ठामपणे उभे राहण्यासाठी भारत व प्रशांत महासागरीय (इंडो-पॅसिफिक) देशांशी संबंध दृढ करण्याच्या व्यापक आणि व्यावहारिकदृष्टय़ा ठाम धोरणाचा तो एक भाग असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुनक यांनी सोमवारी रात्री लंडनच्या महापौरांच्या मेजवानी सोहळय़ात परराष्ट्र धोरणावरील पहिल्या भाषणात आपली मते विस्ताराने मांडली. यावेळी त्यांनी आपल्या वारशाचे स्मरण करून स्वातंत्र्य व मुक्तता या ब्रिटिश मूल्यांचा जगभरात प्रसार व प्रचार करण्याबाबत आपण कटिबद्ध असल्याचेही सांगितले. त्यांनी यावेळी चीनशी संबंधांचे ‘सुवर्णयुग’ सरले असून, यासंदर्भात वेगळय़ा पद्धतीची कार्यशैली अवलंबण्याचा संकल्प केला.  

राजकारणात येण्यापूर्वी मी जगभरातील व्यवसायांत गुंतवणूक केली. यापैकी भारत आणि प्रशांत महासागरीय देशांतील संधी आकर्षक असल्याचे सांगून सुनक म्हणाले, की २०५० पर्यंत, भारत-प्रशांत महासागरीय देश अवघ्या जगाच्या व्यापार वृद्धीत निम्मे योगदान देतील.  तुलनेत युरोप आणि उत्तर अमेरिकेची एक चतुर्थाश वृद्धी असेल. म्हणूनच आपण ‘ट्रान्स-पॅसिफिक व्यापार करारा’त (सीपीटीपीपी) सामील होत आहोत. भारतासोबत नव्या मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पावले टाकत आहोत.  इंडोनेशियाशी करार करण्यासाठीही पाठपुरावा करत आहोत. ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेल्या इतर अनेकांप्रमाणे, माझे आजी-आजोबा पूर्व आफ्रिका आणि भारतीय उपखंडातून येथे आले व त्यांनी येथे  जीवन व्यतीत केले. अलीकडच्या वर्षांत आम्ही हाँगकाँग, अफगाणिस्तान आणि युक्रेनमधील हजारो स्थलांतरितांचे स्वागत केले आहे. आपल्या मूल्यांवर ठाम असलेला आणि केवळ शब्द नव्हे तर कृतीतून लोकशाहीचे रक्षण करणारा असा हा आपला देश आहे, असे ते म्हणाले. 

ब्रिटन-चीन संबंधांचे सुवर्णयुग संपले!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनसंदर्भात सुनक यांनी सांगितले, की आपल्या हुजूर पक्षाच्या सरकारच्या ब्रिटन-चीन संबंधांबाबतच्या धोरणांमध्ये बदल घडवायचे आहेत.  व्यापारामुळे सामाजिक आणि राजकीय सुधारणा घडतील, अशा भोळसट कल्पनांसह तथाकथित ‘सुवर्ण युग’ संपले आहे, हे स्पष्ट आहे. तसेच या संबंधांना शीतयुद्धासारखी सोपी, सोयीस्कर शब्दरचना वापरून त्यावर विसंबण्यात अर्थ नाही. चीन आपल्या मूल्य आणि हितसंबंधांना पद्धतशीररीत्या गंभीर आव्हान उभे करत आहे. ते दिवसेंदिवस वाढत जाईल आणि अधिसत्तावाद अधिक तीव्र होईल, असा इशाराही सुनक यांनी यावेळी दिला. चीनमध्ये सुरू असलेल्या करोना टाळेबंदीविरोधी निदर्शनांबाबत चीन अवलंबत असलेल्या धोरणावरही त्यांनी टीका केली. नागरिकांची फिर्याद ऐकण्याऐवजी सरकारने हे आंदोलन चिरडण्याचा कठोर पर्याय निवडला आहे. चीनमध्ये ‘बीबीसी’च्या पत्रकारांना अटक व मारहाणीचा संदर्भही त्यांनी दिला. प्रसारमाध्यमे व आमचे पार्लमेंट सदस्यांनी शिनजियांगमधील अत्याचार आणि हाँगकाँगमधील स्वातंत्र्याच्या संकोचाविषयी प्रभावीपणे आवाज उठवावा, असे आवाहनही सुनक यांनी यावेळी केले.