बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव हे लोकसभा प्रचारासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दौऱ्यात फिरत असताना हेलिकॉप्टरमध्ये जेवण उरकावं लागतं, हे सांगण्यासाठी तेजस्वी यादव यांनी स्वतःचा एक व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडिओवरून आता त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. सध्या नवरात्र सुरू असून या काळात मांसाहार केले जात नाही. मात्र ९ एप्रिल रोजी तेजस्वी यादव यांनी जो व्हिडिओ शेअर केला, त्यात ते मासे खात असल्याचे दिसले. त्यामुळे भाजपाचे नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली.

या व्हिडिओमध्ये तेजस्वी यादव यांच्यासह विकासशील इन्सान पक्षाचे (VIP) अध्यक्ष मुकेश साहनी बसलेले दिसत आहेत. विकास साहनी यांनी माझ्यासाठी जेवण आणले, असे तेजस्वी यादव म्हणतात आणि जेवणात काय काय आहे? हेही दाखवतात. निवडणुकीच्या काळात प्रचारात गुंतलो असल्यामुळे जेवणासाठी वेळच मिळत नाही. हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर जेवणासाठी कसे-बसे दहा मिनिटांचा वेळ काढतो, असे तेजस्वी यादव व्हिडिओत सांगत आहेत.

भाजपा उमेदवाराने प्रचारादरम्यान महिलेचं घेतलं चुंबन; फोटो व्हायरल

या व्हिडिओत मुकेश साहनी हेही बोलताना दिसत आहेत. जेवणातल्या ताटातली मिरची उचलून ते दाखवितात. आम्हाला एकत्र जेवताना पाहून काही लोकांना मिरची लागण्याची शक्यता आहे. पण त्यांनी मिरची लावून घेऊ नये, त्यांनी आमच्याकडून मिरची मागून घ्यावी, असे म्हणत आहे.

भाजपाने मात्र तेजस्वी यादव यांच्या व्हिडिओवर जोरदार टीका केली आहे. उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा म्हणाले की, काही लोक ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहते. ते हंगामी सनातनी बनतात. यावेळी त्यांनी श्रावणमध्ये मटण खाणाऱ्यावर टीका केली. तसेच आता नवरात्रीचा काल असून काही लोक जाणूनबुजून मासे खात असून त्याचे व्हिडिओ तयार करत आहेत. यामुळे त्यांच्याकडून ध्रुवीकरणाचे राजकारण होत असल्याचा आरोप मनोज कुमार सिन्हा यांनी केला.

“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”

“राष्ट्रीय जनता दल हा हंगामी सनातनी पक्ष आहे. मात्र ते सनातनी धर्माचे आचरण करत नाहीत. कुणी काय खावे, याबाबत माझे काहीही म्हणणे नाही. पण श्रावणमध्ये मटण खाणं आणि नवरात्रीमध्ये मासे खाणे, हे सनातन धर्माच्या नियमात बसत नाही. हे सर्व करून आरजेडीकडून ध्रुवीकरणाचे राजकारण केले जात आहे”, असा आरोप उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी केला.

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून आरजेडी आणि काँग्रेस इंडिया आघाडीत निवडणूक लढवत आहेत. तर भाजपा आणि नितीश कुमार हे आघाडीत निवडणूक लढवत आहेत.