बिहारचा बाहुबली अशी ओळख असलेले आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते मोहम्मद शाहबुद्दीन यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, चुकीच्या माहितीमुळे गोंधळ उडाल्याचं नंतर स्पष्ट झालं. शाहबुद्दीन यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त ‘एएनआय’ने सुरुवातीला दिलं होतं. मात्र, ते वृत्त चुकीच्या माहितीमुळे दिल्या गेल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तिकडे तिहार तुरूंग प्रशासनानंही मृत्यूचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

राजदचे माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांना करोनाची लागण झाल्यानंतर तिहार तुरूंगातून एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. एएनआयने सुरूवातीला ट्विट करून करोनावरील उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. नंतर एएनआयने चुकीच्या माहिती वृत्त दिलं गेल्याचा खुलासा केला आहे. निधनाचं ट्विट डिलीट केलं असून, अधिकृत माहितीच्या प्रतिक्षेत असल्याचं एएनआयने स्पष्ट केलं. शाहबुद्दीन यांच्या कुटुंबियांकडून आणि राजद प्रवक्त्यांकडून चुकीची माहिती दिली गेल्याचा खुलासा एएनआयने केला आहे.

बिहारचा बाहुबली अशी ओळख असलेले मोहम्मद शाहबुद्दीन तिहार तुरुंगात एका दुहेरी हत्येप्रकरणात शिक्षा भोगत आहेत. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाचं संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं.

२००४ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात शाहबुद्दीन यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. वसूलीचा पैसा न दिल्याने दोन भावांची हत्या करण्यात आल्याची ही घटना होती. मोहम्मद शाहबुद्दीन यांचा बिहारमध्ये दबदबा होता. ते दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिलेले आहेत.