Rohini Acharya Tejashwi Yadav Family Dispute: नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०० हून अधिक जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. तर दुसरीकडे राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला ५० जागांवरही विजय मिळवता आला नाही.

या पराभवानंतर महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या कुटुंबामध्ये मोठा कलह निर्माण झाला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि तेजस्वी यादव यांच्या भगिनी रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. याचबरोबर त्यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबियांशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohini Acharya disowns family
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. (Photo: Rohini Acharya/X)

जे त्यांचे कुटुंब एकत्र ठेवू शकत नाहीत…

दरम्यान रोहिणी आचार्य यांनी कुटुंब आणि पक्षावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिंह म्हणाले की, “जे लोक कुटुंब सांभाळू शकत नाहीत, ते राज्य कसे व्यवस्थित चालवतील?”

या प्रकरणावर बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिंह म्हणाले की, “राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकाळात राज्यात अराजकता दिसून येत होती, आता ती कुटुंबातही दिसत आहे. अशा विचारसरणीचे लोक जे त्यांचे कुटुंब एकत्र ठेवू शकत नाहीत, ते राज्याचे कामकाज कसे व्यवस्थित चालवतील? आम्ही यावर भाष्य करणार नाही, कारण हा त्यांच्या कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे.”

रोहिणी आचार्य यांची पोस्ट

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या आणि तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी शनिवारी राजकारण सोडत असल्याचे जाहीर केले. याचबरोबर त्यांनी कुटुंबीयांशी सर्व संबंध तोडल्याचीही घोषणा केली.

रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले होते की, “मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्या सांगण्यावरून मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे, त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.”

Rohini Acharya Tejashwi Yadav family dispute

बिहार निवडणुकीत काय घडले?

भारतीय जनता पार्टी आणि संयुक्त जनता दलाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएने २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी केली. बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

एनडीएने जिंकलेल्या २०२ जागांपैकी भाजपाला ८९ जागांवर विजय मिळाला, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) लढवलेल्या २९ जागांपैकी १९ जागा जिंकल्या, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाने ५ जागा जिंकल्या तर राष्ट्र लोक मोर्चाने ४ जागा जिंकल्या.

Rohini Acharya Tejashwi Yadav family dispute

दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यांना केवळ ३५ जागांवर विजय मिळवता आला. महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष राष्ट्रीय जनता दलाला केवळ २६ जागांवर विजय मिळाला. २०२० च्या निवडणुकीत ७५ जागांसह राष्ट्रीय जनता दल बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर गेल्या निवडणुकीत १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा केवळ ६ जागांवर यश मिळाले.