युरोपीय अवकाश संस्थेच्या फिली या यंत्रमानवरूपी लँडरने ६७ पी चुरयुमोव- गेरिसमेन्को या धूमकेतूवर चांगले बस्तान बसवले असून त्याने रोसेटा या मातृयानाशी संपर्क साधला; शिवाय काही छायाचित्रेही पृथ्वीकडे पाठवली आहे.  हे लँडर अपेक्षित ठिकाणापासून १ कि.मी अंतरावर उतरले होते व आता त्याची बॅटरी संपल्यानंतर ते थंम्डावले आहे पण त्याच्याआधीच त्याने धूमकेतूची बरीच माहिती पाठवली आहे. बुधवारी मध्यरात्री फिलीने रोसेटाशी संपर्क साधला पण त्याच्या बॅटरीत बिघाड निर्माण होण्याची शक्यता आहे. माय हॅश लाइफ ऑन कॉमेट हॅज बिगन असा पहिला ट्विट वॉिशग मशीन एवढय़ा आकाराच्या फिली लँडरने खोल अवकाशातून पाठवला आहे व नंतर ‘हुश्श’ म्हणजे आता झोपतो, असा संदेश पाठवला आहे, असे पृथ्वीवरून यानाचे निरीक्षण करणाऱ्यांनी सांगितले. युरोपीय अवकाश संस्थेने म्हटले आहे, की फिली ही रोबोट प्रयोगशाळा आता विश्रांत अवस्थेत असून त्याची सर्व उपकरणे बंद करण्यात आली आहेत. तीन दिवस त्याने काम केले आहे, छायाचित्रे घेतली आहेत व धूमकेतूची घनता, तपमान, रचना व वातावरण यांचा अभ्यास केला आहे.
शांत होण्यापूर्वी लँडरने छायाचित्रांसह माहिती पाठवली आहे. रोसेटा या मातृयानाच्या मार्फत लँडर माहिती पाठवत आहे. दिवसातून दोनदाच ही माहिती पाठवता येते. एकदा रोसेटा यान धूमकेतूच्या मागे दिसेनासे झाले होते. फिलीमध्ये पृथ्वीशी संपर्क साधण्याइतकीही ऊर्जा राहिलेली नाही असे वैज्ञानिकांना वाटत होते पण ते खोटे ठरले व त्याने व्यवस्थित संदेश पाठवले व छायाचित्रेही पाठवली, त्यामुळे वैज्ञानिकांना आश्चर्य वाटले.
‘परग्रहावरील जगाचे विज्ञान’ अशा शब्दात युरोपीय एजन्सीने ट्विट केले असून आता माहिती येत आहे असे म्हटले. व्यवस्थापक उलमेक यांनी मात्र शनिवारनंतर लँडर मातृयानाशी संपर्क साधू शकणार नाही, अशी भीती जर्मनीत डार्मस्डॅट येथे नियंत्रण कक्षात व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rosetta comet mission
First published on: 17-11-2014 at 12:59 IST