Congress-BJP Workers Fight Video Viral: काँग्रेसच्या दरभंगा येथील मोर्चामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्रीबद्दल अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यानंतर आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. यानंतर काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झडप झाली. यानंतर झेंडे, लाठ्या-काठ्या घेऊन दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

भाजपाचे आमदार नितीन नबीन म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या आईचा अवमान केल्याप्रकरणी बिहारचा प्रत्येक मुलगा काँग्रेसला जशासतसे प्रत्युत्तर देईल. आम्ही याचा सूड नक्कीच घेऊ.

दरम्यान काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेले अवमानकारक विधान भाजपाच्या एजंटनी केलेले आहे. जे दरभंगाच्या रॅलीत घुसले होते. “अवमानकारक विधान भाजपाच्याच लोकांनी आमच्या रॅलीत घुसखोरी करून केले होते. आमच्या यात्रेच्या मुद्द्यावरून लक्ष दूर करण्यासाठीच या विषयाचे राजकारण करण्यात येत आहे. त्यांच्या घुसखोरांना आम्ही पकडले असून यातून त्यांची अगतिकता लक्षात येते”, असेही खेरा म्हणाले.

खेरा पुढे म्हणाले की, ज्याला अटक करण्यात आली आहे, तो कुणाचा माणूस आहे, हे नीट बघा. जनतेला सर्वकाही दिसत आहे. संपूर्ण देश भाजपाच्या गुंडगिरीकडे पाहत आहे.

कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त कृष्णा मुरारी प्रसाद यांनी सांगितले की, या हाणामारी दरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली. याची आम्ही सविस्तर चौकशी करत आहोत. जर मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर त्यासंदर्भातही पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल केले जाईल.

अमित शाह यांच्याकडून टीका

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. “काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द वापरून निदंनीय कृत्य केले आहे. पंतप्रधान मोदींना जगात नावाजले जाते. पण राहुल गांधींनी घृणा आणि तिरस्काराच्या नकारात्मक राजकारणाची सुरुवात केली आहे. त्याचेच हे प्रदर्शन आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.

पंतप्रधान मोदींना जितक्या शिव्या द्याल, कमळ तितके फुलेल

अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान मोदींविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादी दिली आणि अशा भाषेचा वापर करून निवडणूक जिंकता येईल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. “सोनिया गांधी, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, रेणुका चौधरी आणि काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद भाषा वापरली आहे”, असा आरोप अमित शाह यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदींना तुम्ही जितक्या शिव्या द्याल, भाजपाचे कमळ तेवढे अधिक फुलेल, असेही ते म्हणाले.