राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सर्व भारतीयांचा डीएनए एकच असल्याचं वक्तव्य केलं आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. “सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. तसेच देशातील हिंदू-मुस्लिम एकता एक भ्रामक चर्चा आहे. कारण आम्ही वेगळे नाहीत, तर एकच आहोत. पूजा करण्याच्या पद्धतीवरून लोकांमध्ये भेद करणं चुकीचं आहे.” असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच जमावातून एखाद्याची हत्या करणारे लोक हिंदुत्व विरोधी असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात गेल्या काही दिवसात धर्मांतरच्या बातम्या येत असताना त्यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशात धर्मांतरण करणाऱ्या लोकांवर कारवाईचे आदेश योगी सरकारने दिले आहेत.

“जर कुणी व्यक्ती असं सांगत असेल की, इथे मुस्लिम राहु शकत नाहीत. तर तो व्यक्ती हिंदू नाही. गाय एक पवित्र प्राणी आहे. मात्र जे लोक गायीच्या नावाने दुसऱ्यांना मारत आहे. ते हिंदुत्व विरोधात जात आहेत. या लोकांवर कायद्याने पक्षपात न करता कारवाई केली पाहीजे”, असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

“आपण मागच्या ४० हजार वर्षांपासून एका पुर्वजांचे वंशज आहोत. भारतातील लोकांचा डीएनए एकच आहे. हिंदू-मुस्लिम असे दोन समूह नाही. एकत्र येण्यासारखं काहीच नाही. कारण आम्ही पहिल्यापासूनच एक आहोत. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो. त्यामुळे इथे हिंदू आणि मुस्लिमांचं प्रभुत्व निर्माण होऊ शकत नाही. फक्त भारतीयांचं प्रभुत्व निर्माण होऊ शकतं. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार असला पाहीजे.”, असं मोहन भागवत यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितलं.

‘पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही’; ओवेसींचं आव्हान योगींनी स्वीकारलं, म्हणतात…

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ प्रमुख भोहन भागवत गाजियाबादमध्ये राष्ट्रीय मुस्लिम मंचने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेले होते. तिथे डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. डॉ. ख्वाजा अहमद यांनी वैचारिक समन्वय- एक पहल नावाचं पुस्तक लिहिलं आहे.