राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की हिंदू असणं म्हणजे भारतासाठी जबाबदार असणं. बंगळुरु या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात त्यांनी हे विधान केलं. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सत्तेचा कुठलाही मोह नाही असंही मोहन भागवत म्हणाले आहेत.

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

हिंदू असण्याचा अर्थ आहे भारतासाठी जबाबदार असणं. हिंदू समाजाला सत्तेसाठी नाही तर राष्ट्र गौरवासाठी संघटित करणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं लक्ष्य आहे. भारतात कुणीही अहिंदू म्हणजेच बिगर हिंदू नाहीय कारण सगळ्यांचे पूर्वज सारखेच आहेत आणि त्यांची संस्कृती ही देशाची मूळ हिंदू संस्कृती आहे. जेव्हा संघ एकसंधपणे समाजासाठी उभा राहतो तेव्हा सत्ता मिळवणं हा उद्देश नसतो. आमचा उद्देश फक्त सेवा आहे. भारताच्या गौरवासाठी हिंदूंनी संघटीत झालं पाहिजे. लोकांना या गोष्टीवर विश्वास ठेवणं जड जात होतं मात्र आता अनेकांचा यावर विश्वास बसू लागला आहे. असं मोहन भागवत यांनी बंगळुरु या ठिकाणी म्हटलं आहे.

आपल्याला आपलं राष्ट्रीयत्व ब्रिटिशांनी दिलेलं नाही-भागवत

मोहन भागवत पुढे म्हणाले, हिंदू समाजावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्ष्य केंद्रीत केलं की आम्हाला प्रश्न विचारला जातो की तुम्ही हे का करत आहात? प्रत्येक हिंदू हा भारतासाठी जबाबदार व्यक्ती आहे. आपल्याला आपली राष्ट्रीयता ही ब्रिटिशांनी दिलेली नाही. आपण प्राचीन काळापासून हिंदू आहोत. जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना हे वास्तव ठाऊक आहे. प्रत्येक राष्ट्राची एक मूळ संस्कृती असते. भारताची मूळ संस्कृती काय? हा प्रश्न आपण विचारला तर त्याचं जे वर्णन आहे ते आपल्याला हिंदू या शब्दाकडे घेऊन जातं असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

संघाची १०० वर्षांची वाटचाल सोपी नव्हती-भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत भूमिका मांडताना मोहन भागवत म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठीचं मार्गक्रमण हे सोपं नव्हतं. संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातली ६० ते ७० वर्षे ही संघर्षाची आणि तीव्र विरोध सहन करायला लावणारी होती. संघावर दोनवेळा बंदी घातली गेली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्लेही झाले, टीका झाली, स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या. आपला विस्तार होऊ नये यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न झाले. मात्र स्वयंसेवकांनी ते होऊ दिलं नाही. निस्पृह भावनेने स्वयंसेवक आणि संघ काम करत राहिला. त्यामुळेच आपण लोकांच्या मनांमध्ये विश्वास निर्माण करु शकलो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.