हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. भारत आणि हिंदूंना वेगळं केलं जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे आयोजित एका कार्यक्रमत ते बोलत आहेत. यावेळी ते म्हणाले की, “कोणत्याही हिंदूविना भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाहीत”.

“भारत आपल्या पायांवर स्वत: उभा राहिला. हेच हिंदुत्वाचं सार आहे, याच कारणामुळे भारत हिंदूंचा देश आहे,” असं मोहन भागवत म्हणाले आहेत.

मोहन भागवत यांनी यावेळी फाळणीचा उल्लेख करत म्हटलं की, “फाळणीनंतर भारताचे तुकडे झाले आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. आरण हिंदू आहोत ही संकल्पना विसरल्यामुळेच हे झालं. तेथील मुस्लीमदेखील हे विसरले होते. आधी स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची ताकद कमी झाली, नंतर त्यांची संख्या कमी झाली. म्हणूनच पाकिस्तान भारत राहिला नाही”.

मोहन भागवत यांनी यावेळी हिंदूंची संख्या कमी होत असल्याचं म्हटलं. “हिदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे किंवा हिंदुत्वाची भावनाच कमी होत आहे. भारत हिंदुस्थान असून हिंदू आणि भारत वेगळे होऊ शकत नाहीत. जर हिंदूंना हिंदू राहायचं असेल तर भारताने अखंड होण्याची गरज आहे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. याआधी मोहन भागवत यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना फाळणीच्या वेळी भारताने सहन केलेल्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं.