हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर रविवारी आग्रा येथे संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हिंदूंचा प्रजननदर असाच कमी राहिला तर त्यांना आपले अस्तित्त्वच विसरायला लागेल, असे उपस्थितांना मार्गदर्शकांकडून समजावण्यात आले. आकड्यांची मदत घेऊनच हिंदूंचा आणि इतर धर्मियांचा प्रजननदराबद्दल यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मोहन भागवत यांनीच भूषविले.
आग्रामध्ये रविवारी कुटुंब प्रबोधनाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी २००० नवविवाहित दाम्पत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हिंदूच्या प्रजननदराबद्दल उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले. हिंदूचा प्रजनन दर सध्या २.१ टक्के इतका आहे. यातुलनेत इतर धर्मियांचा प्रजनन दर ८ टक्क्यांनी जास्त आहे. जर हीच स्थिती पुढे अशीच चालू राहिली तर २०२५ पर्यंत देशातील हिंदूंचे अस्तित्त्वच संपुष्टात येईल. हिंदूंनी जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर त्यांना आपल्या धर्माची मूल्ये शिकवण्याची गरज आहे, असे या कार्यक्रमात उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. यूरोपमध्ये मुसलमानांची संख्या पाच कोटींपेक्षा पुढे वाटचाल करीत असल्याने लवकरच हा मुस्लिम बहुसंख्य प्रदेश म्हणून गणला जाऊ शकतो, असेही यावेळी एका वक्त्याने सांगितल्याचे समजते.
हिंदूंनी अधिकाधिक मुलांना जन्म द्यावा- मोहन भागवत
कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या दाम्पत्यांपैकी एका महिलेने यावेळी थेट भागवतांनाच प्रश्न विचारल्याचेही समजते आहे. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम जर दोघेही जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यामागे लागले, तर त्यामुळे देशात अन्नधान्याचा, रोजगार संधीचा तुटवडा निर्माण होणार नाही का, असा प्रश्न विचारला.
इतर धर्मिय लोक जर अनेक मुलांना जन्म देऊ शकतात. तर हिंदूंना कोणी रोखले आहे? असा सवाल मोहन भागवत यांनी आग्रा येथील एका कार्यक्रमात केला होता. हिंदूंची लोकसंख्या कमी होत असल्यामुळे भागवतांनी हा सल्ला दिला. यावेळी भागवत म्हणाले की, तुम्ही लोक म्हणत आहात की ‘त्यांची’ संख्या वाढत आहे. मात्र हिंदूंना कोणी रोखले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया यावेळी उंचावल्या होत्या.