महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केली, असा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात संघाने कर्नाटकातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. अशा आरोपांमुळे संघाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करीत यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याचेही संघाने तक्रारीत नोंदवले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या विखारी टीकेमागे ‘छुपी राजकीय महत्त्वाकांक्षा’ असून भिवंडीसारख्या मुस्लिमबहुल भागात त्यांनी हे वक्तव्य जाणूनबुजून केले, असा आक्षेप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी नोंदवले. संघाने गांधीजींना मारले असा आरोप मुस्लिमांसमोर करताना संघ त्यांच्याबाबतीतही असेच करू शकतो, असेच राहुल गांधी यांना जणू सुचवायचे होते, अशी टीकाही राम माधव यांनी केली.
राहुल गांधी यांनी संघावर विखारी टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अनेकदा त्यांनी संघावर बेछूट आणि बेताल आरोप केले आहेत. मात्र असे करण्याने हिंदू आणि मुसलमान यांच्यातील द्वेषभावनेसच खतपाणी घातले जात आहे, याचे भान त्यांना राहिले नाही, असेही माधव म्हणाले.
राहुल यांच्या विधानाची ‘योग्य ती दखल’ संघाने घेतली असून निवडणूक आयोगाने अशी द्वेषभावना पसरविणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही संघातर्फे आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले.
संघानेच गांधीजींची हत्या केली- राहुल गांधी
पुत्राच्या ‘प्राथमिक’ निर्णयामुळे सोनिया अस्वस्थ!