रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजूनही थांबलेला नाही. रशियाकडून युक्रेनवर हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले केले जात आहेत. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण ३५ जणांचा मृत्यू झाला असून १३४ जण जखमी झाले आहेत. यातील अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एनडीटीव्हीने याबाबत सविस्तर वृत्त दिले असून या वृत्तानुसार नेटो देशांमध्ये सामील असलेल्या पोलंडच्या सीमेजवळ हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ३५ नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येतेय. ज्या ठिकाणी हल्ला झाला, तेथील प्रांतीय गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी हल्ल्याची पुष्टी केली आहे. युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याचा निषेध केला असून त्यांनी युक्रेन आणि नाटो देशाच्या सीमेजवळील शांती आणि सुरक्षेवरचा हा दहशतवादी हल्ला आहे, असं म्हटलंय.
दरम्यान, रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह या शहराच्या परिसरातही हवाई हल्ले वाढवले आहेत. रशियाने मारियोपोल या बंदर असलेल्या शहरावर जोरदार हल्ला केल्यामुळे या भागात शुक्रवारी मोठी जीवितहानी झाली होती. याठिकाणी असलेल्या मशिदीमध्ये लहान मुलांसह ८० जणांनी आश्रय घेतला होता. या मशिदीवरदेखील रशियन फौजांनी तोफगोळ्यांचा मारा केल्याचा दावा युक्रेन सरकारने केलाय. त्यानंतर आता रशियाने सैनिकी तळावर हल्ला केल्यामुळे दोन्ही देशांमधील युद्ध आणखी चिघळणार का ? असा प्रश्न विचारला जातोय.