हवाई संरक्षण देणाऱ्या S-400 प्रणालीच्या पुरवठ्यास रशियाकडून अखेर सुरुवात झाली आहे. २०१८ मध्ये रशियाशी S-400 प्रणाली ही ५ अब्ज डॉलर्सला विकत घेण्याबाबतचा करार झाला होता. S-400 च्या एकुण सहा बटालिन उभारण्यात येणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा होण्यापूर्वी S-400 प्रणालीच्या पुरवठ्याला सुरुवात झाली आहे हे विशेष. डिसेंबर अखेरपर्यंत पहिल्या बटालिनमधील काही यंत्रणा कार्यन्वित झालेली असेल. एकुण सहा बटालियन्स या पुढील दिड ते दोन वर्षात पुर्णपणे कार्यान्वयित झालेल्या असतील.

S-400 प्रणाली ही का महत्त्वाची ?

४०० किलोमीटर परिघात ध्वनीच्या १४ पट या प्रचंड वेगाने येणारे कोणतेही लक्ष्य भेदण्याची या प्रणालीची क्षमता आहे. म्हणजेच कुठल्याही क्षेपणास्त्राला पाडणे S-400 मुळे शक्य होणार आहे. तसंच या प्रणलाीद्वारे लढाऊ विमान, ड्रोन यांना भेदणे सहज शक्य होणार आहे. राजधानी दिल्ली, मुंबई सारखी शहरे किंवा देशातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांच्या संरक्षणासाठी S-400 प्रणााली तैनात केली जाऊ शकते. एवढंच नाही तर युद्धप्रसंगी किंवा युद्धजन्य प्रसंगी ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषतः चीनबरोबर २०१८ पासून सीमा संघर्ष चिघळला असतांना S-400 सारखी हवाई संरक्षण देणारी यंत्रणा दाखल होत आहे ही अत्यंत जमेची बाजू ठरणार आहे. शक्तीशाली रडार यंत्रणा, विशेष संगणक प्रणाली आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे अशा या प्रणालीचा पसारा आहे. ४०० किलोमीटरच्या परिघातील लक्ष्य शोधणे आणि प्रणालीद्वारे आदेश देत जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागणे हे अवघ्या काही सेकंदात केलं जातं. या प्रणालीमुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

विशेष म्हणजे चीनकडे हीच S-400 प्रणाली २०१५ मध्ये दाखल झाली होती. तर बेलारुस, टर्की, सौदी अरेबिया देशांकडे ही प्रणाली दाखल होण्याबाबत चर्चा सुरु आहे. तर इराण, दक्षिण कोरीया, कतार, इजिप्त हे देश रशियाची ही प्रणाली घेण्यासाठी उत्सुक आहे. भारताने २०१८ ला S-400 प्रणालीबाबत जेव्हा रशियाशी करार केला तेव्हा अमेरिकेने या कराराला तीव्र विरोध केला होता, काही निर्बंध टाकण्याची धमकी दिली होती. तरीही अमेरिकेच्या धमकीला भिक न घालता रशिया आणि भारताने हा करार केला होता.