Russia launches 149 drones at Ukraine four Killed : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यादरम्यान रशियाने पुन्हा एकदा युक्रेनमध्ये मोठा ड्रोन हल्ला केला आहे, या हल्ल्यात किमान ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध संपवण्याच्या इच्छेबद्दल शंका व्यक्त केल्याच्या दुसर्‍याच दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे.

डोनेत्स्क (Donetsk) भागातील कोस्ट्यान्टिनिव्हका (Kostyantynivka) शहरावर झालेल्या या हवाई हल्ल्यात तीन जण ठार आणि चार जखमी झाल्याची माहिती प्रादेशिक अभियोक्ता कार्यालयाकडून देण्यात आली आहे. ड्निप्रोपेट्रोव्हस्क (Dnipropetrovsk) भागातील पाव्हलोहार्ड येथे झालेल्या दुसर्‍या एका हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक १४ वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. भागात सलग तीन रात्री हल्ले करण्यात आले, अशी माहिती गव्हर्नर सेर्ही ल्यसाक (Serhii Lysak) यांनी दिली.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अचानक हल्ला चढवून युक्रेनियन लष्कराने ताब्यात घेतलेल्या काही कुर्स्क भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे, या घडामोडींदरम्यान युक्रेनवर रशियाकडून हल्ले केले जात आहेत. मात्र युक्रेनियन अधिकाऱ्यांकडून मात्र या भागात अजूनही लढाई सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प काय म्हणाले होते?

विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी पुतिन यांच्या युद्ध थांबवण्याच्या इच्छेबद्दल शंका व्यक्त केली होती. “मला वाटत नाही की पुतिन यांना युद्ध संपवायचे आहे, त्यांनी नागरी भागात क्षेपणास्त्रे डागण्याचे कोणतेही कारण नाही,” असे ट्रम्प म्हणाले होते. याबरोबरच त्यांनी रशियाविरोधात आणखी निर्बंध लादण्याचा इशारा देखील यावेळी दिला होता.

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी व्हॅटिकन येथे ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट झाली होती, यानंतर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले होते . फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या वादानंतर या दोन नेत्यांची ही पहिलीच भेट होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नुकत्याच झालेल्या हल्ल्यामध्ये रशियाने १४९ ड्रोन वापरून युक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्यात डिकॉय ड्रोनचा देखील समावेश होता. ज्यापैकी ५७ ड्रेन पाडण्यात आले तर दुसरे ६७ ड्रोन्स जॅम करण्यात आले अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली आहे.