अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचा रशियाने नुकताच आढावा घेतलाय. मॉस्कोमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तालिबानसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पुतिन यांनी रशिया तालिबानला दहशतवादी संघटनांच्या यादीमधून हटवण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. संयुक्त राष्ट्रांकडूनही अशापद्धतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता पुतिन यांनी व्यक्त केलीय. रशियाने हा निर्णय घेतला तर तालिबान सत्तेत आल्यापासूनचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांना मिळालेला सर्वात मोठा दिलासा ठरेल असं सांगितलं जात आहे.

रशियामधील वृत्तसंस्था असणाऱ्या तासने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींसंदर्भातील चर्चेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तालिबानबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिलीय. अफगाणिस्तानमधील परिस्थिती तालिबान ज्या पद्धतीने हाताळत आहे ते पाहून भविष्यामध्ये तेथील परिस्थिती अधिक सकारात्मक असेल असं दिसत आहे. आम्ही अफगाणिस्तानसंदर्भातील निर्णयांमध्ये ऐक्य कायम ठेवतानाच लवकरात लवकर तालिबानला दहशतवादी संघटनाच्या यादीमधून काढण्यासंदर्भातील निर्णयावर विचार करु, असं पुतिन म्हणालेत. २०३६ पर्यंत पुतीन हेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहणार असल्याने त्यांच्या या वक्तव्याला फार जास्त महत्व असल्याचं मानलं जात आहे. २००१ साली अफगाणिस्तानमधील सत्तेतून पायउतार झाल्यानंतर २००३ सालापासून अफगाणिस्तानमधील हा विरोधकांचा गट रशियाच्या दहशतवाद्यांच्या यादीत आहे.

आंतरराष्ट्रीय वल्दाई डिस्कशन क्लबच्या या बैठकीमध्ये पुतिन यांनी, “आम्ही तालिबानसंदर्भातील आमच्या भूमिकेमध्ये बदल करत आङोत. तालिबाननला दहशतवादी संघटनाच्या यादीमधून बाहेर काढण्याच्या निर्णयाच्या आम्ही फार जवळ आहे. मात्र हा निर्णय त्याच पद्धतीने घेतला गेला पाहिजे ज्या पद्धतीने टप्प्याटप्प्यात त्यांचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादी करण्यात आला,” असं म्हटलं आहे.

याचप्रमाणे तालिबानला दहशतवादी संघटनांच्या यादीमधून काढण्याचा निर्णय आपला एकट्याचा नसल्याचंही पुतिन यांनी स्पष्ट केलं. “आम्ही सातत्याने तालिबानी प्रतिनिधींच्या संपर्कात आहोत. आम्ही तालिबानला मॉस्कोमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. अफगाणिस्तानमध्येही आम्ही त्यांच्यासोबत संपर्कात राहणार आहोत,” असं पुतिन यांनी म्हटलं आहे. तालिबानला दहशतवादी संघटनांच्या यादीत काढण्यासंदर्भात भाष्य करतानाच आता अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार हे एक वास्तव असल्याचं आपल्याला मान्य करावं लागेल असंही पुतिन म्हणाले. अफगाणिस्तानला सध्या तालिबानी प्रशासन चालवत आहे हे सत्य आता जगाला मान्य करावं लागणार आहे, असं पुतीन यांनी म्हटलं आहे.