Russian Foreign Minister Sergei Lavrov on Peace talks : गेल्या साडेतीन वर्षांपासून रशिया व युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे. अमेरिकेसह जगभरातील अनेक देश आता हे युद्ध थांबावं यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, रशियाने म्हटलं आहे की “पाश्चात्य देश युक्रेनमधील शांततेसंबंधी चालू असलेल्या चर्चेत अडथळा निर्माण करत आहेत.” रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांनी म्हटलं आहे की “युक्रेनमध्ये चालू असलेलं युद्ध थांबावं असं पाश्चात्य देशांना वाटत नाही. त्यमुळे युद्धविरामाच्या चर्चा बंद होतील किंवा त्यात अडथळे येथील अशा कारवाया पाश्चात्य देश करत आहेत.”
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की ते रशिया व युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, हे दोन्ही देश एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत चर्चेला नकार देत आहेत.
सर्गेई लाव्हरोव यांचा पाश्यात्य देशांवर गंभीर आरोप
सर्गेई लाव्हरोव पाश्चात्य देशांवर टीका करताना म्हणाले, “हे लोक कुठलीही कारणं पुढे करून चर्चा थांबवतात.” सर्गेई युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यावर टीका करत म्हणाले, “ते त्यांच्या अटी व शर्तींसह आमचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटू इच्छितात. ट्रम्प व पुतिन यांनी एकत्र येत चर्चेसाठी एक व्यासपीठ तयार केलं आहे. मात्र, युक्रेन आता ते व्यासपीठ नष्ट करू पाहतोय.
“ट्रम्प व पुतिन यांच्यातील चर्चेनंतर आम्हाला आशेचा किरण दिसू लागला होता. हे युद्ध थांबेल असं वाटत होतं. आम्ही अजूनही आशावादी आहोत की ही गोष्ट युक्रेनच्याही लक्षात येईल.”
“युक्रेनमध्ये कुठल्याही देशाचं सैन्य चालणार नाही”
लाव्हरोव म्हणाले की “वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी पुतिन यांना भेटण्यासाठी अटी घातल्या आहेत. अशी कुठलीही भेट होण्याआधी पाश्चात्य देश व अमेरिकेने युक्रेनला सुरक्षिततेची हमी द्यावी. जेणेकरून रशिया पुन्हा हल्ला करणार नाही. चर्चा करत असताना अशा अटींचा अडथळा निर्माण करणं योग्य नाही. तसेच युक्रेनमध्ये युरोपच्या सैन्याची उपस्थितीत आम्ही अजिबात सहन करणार नाही”
दरम्यान, रशियाने दावा केला आहे की युक्रेनने शनिवारी मध्यरात्री रशियावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामुळे त्यांच्या पश्चिम कुर्स्क प्रांतातील अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित ठिकाणी आग लागली होती. अशाने युद्ध आणखी भडकेल, असंही रशियाने म्हटलं आहे.