Tsunami Hits Russia Video: रशियाच्या कामचात्का द्वीपकल्पाच्या किनारपट्टीवर बुधवारी ८.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात त्सुनामी आली असून, किनारपट्टीवरील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. दरम्यान, त्सुनामीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यालगतच्या अनेक इमारती पाण्यात बुडालेल्या दिसत आहेत.
दरम्यान, त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर रशियाच्या पूर्वेकडील प्रांताच्या गव्हर्नरांनी नागरिकांना “किनाऱ्यापासून दूर राहा” असे आवाहन केले होते. त्सुनामीपूर्वीचा हा भूकंप अंदाजे १९ किलोमीटर खोलवर झाला होता आणि पेत्रोपावलोव्ह्स्क-कामचात्स्की शहराच्या ईशान्येकडील सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर त्याचे केंद्र होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, त्सुनामीच्या लाटा ४ मीटर उंचीपर्यंत उसळल्या असून, अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे.
“आजचा भूकंप गंभीर होता आणि गेल्या काही दशकांमधील सर्वात तीव्र होता” असे कामचात्काचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही, परंतु एका शाळेचे नुकसान झाले आहे.
भूकंपानंतर ज्या भागांना याचा फटका बसला आहे, त्या भागातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात इमारतींमध्ये जोरदार हादरे बसल्याचे दिसून येत आहे. एका व्हिडिओमध्ये, भूकंपाचा धक्का बसला तेव्हा एका निवासी अपार्टमेंटमधील फर्निचर जोरदार हादरताना दिसत आहे.
रशियातील या त्सुनामीनंतर जपान, हवाई आणि पॅसिफिकच्या इतर भागांसाठी त्सुनामीचा इशारा देखील देण्यात आला आहे. जपानच्या हवामान संस्थेने इशारा दिला आहे की, ०: १०० जीएमटी च्या सुमारास ३ मीटर उंचीच्या लाटा किनारी शहरांना धडकू शकतात.
अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीने रशिया आणि जपानच्या काही किनाऱ्यांवर पुढील तीन तासांत “धोकादायक त्सुनामी लाटा” येण्याचा इशारा देखील जारी केला आहे. अमेरिकेच्या गुआम बेट प्रदेश आणि मायक्रोनेशियाच्या इतर बेटांवर देखील त्सुनामी वॉच लागू करण्यात आला आहे. कामचत्का आणि रशियाचा सुदूर पूर्व पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेला आहे, जो भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय प्रदेश आहे जे भूकंप आणि ज्वालामुखी प्रवण क्षेत्र आहे.