एपी, झापोरिझिया (युक्रेन)

रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात १२ पेक्षा जास्त  नागरिक मारले गेल्याची भीती आहे. येथील बिलोहोरिव्ह्का या गावातील एका शाळेच्या तळघरात ९० नागरिकांनी आश्रय घेतला होता. तेथे हा हल्ला झाला.

रशियाचे सैन्य पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या खेडय़ांत, गावे व शहरांवर बॉम्बहल्ले करत आहे. युक्रेनच्या औद्योगिक परिसरापैकी एक असलेल्या लुहान्स्क भागाचे गव्हर्नर सेर्ही हैदेई म्हणाले, की बिलोहोरिव्ह्का या गावातील एका शाळेवर शनिवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यामुळे  तेथे आग लागली. त्या ठिकाणी  मदत पथकाला दोन मृतदेह सापडले. त्यांनी ३० नागरिकांची सुटका केली. या शाळेच्या ढिगाऱ्याखाली ६० जण अडकले असावेत. त्यांचा मृत्यू झाल्याची भीती हैदेई यांनी टेलिग्रामवर व्यक्त केली. प्रिव्हिलिया गावात बॉम्बहल्ल्यात ११ आणि १४ वर्षीय दोन मुले ठार झाली. युक्रेनची राजधानी कीव्हचा ताबा घेण्यात अपयश येत असल्याने डोन्बास परिसरावर रशियाच्या सैन्याने लक्ष केंद्रित केले आहे. येथे २०१४ पासून रशियाचा पािठबा असलेले फुटीरतावादी कारवाया करत आहेत. त्यांनी काही प्रदेशही ताब्यात घेतला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या या  सर्वात भीषण युरोपीयन युद्धात दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान होत आहे. युक्रेनच्या लष्कराने अनपेक्षितरीत्या प्रभावी बचावतंत्र अवलंबल्याने हे युद्ध लांबले आहे. मात्र, या युद्धात आपल्याला यश येत आहे, हे सोमवारी विजयदिनी दाखवण्यासाठी रशिया मारिओपोल बंदरावर संपूर्ण ताबा मिळवण्याची घाई करत आहे. मारिओपोल शहरातील पोलाद प्रकल्पात आश्रय घेतलेल्या उर्वरित महिला, मुले, ज्येष्ठ नागरिकांची शनिवारी मुक्तता करण्यात आली. या प्रकल्पात असलेल्या युक्रेनच्या  पथकांनी शरण येण्यास नकार देत  आंतरराष्ट्रीय मदत मागितली आहे. मारिओपोलवरील संपूर्ण ताब्यानंतर रशियाला युक्रेनच्या पूर्वी ताब्यात घेतलेल्या क्रिमियाच्या द्वीपकल्पाशी जमिनीवरून थेट संपर्क करणे सोपे जाणार आहे.