ल्विव्ह : पोलंड सीमेजवळील युक्रेनच्या लष्करी प्रशिक्षण तळावर रशियाने रविवारी केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्र हल्ल्यात ३५ जणांचा मृत्यू झाला, तर १३४ जखमी झाले. पोलंड ‘नाटो’चा सदस्य असून त्या देशाच्या सीमेलगतचा हा प्रशिक्षण तळ युक्रेनला पाश्चिमात्य मदत पुरवण्यासाठीचे प्रमुख केंद्र असल्याने रशियाने त्याला लक्ष्य केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाच्या आक्रमणाचा प्रतिकार करणाऱ्या युक्रेनच्या सैनिकांना होणाऱ्या परदेशी शस्त्रास्त्र पुरवठय़ाला लक्ष्य करण्याची धमकी रशियाने दिली होती. त्यानंतर युक्रेनच्या या महत्त्वाच्या लष्करी तळावर रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यात मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झाली.

‘‘रशियन सैन्याने ल्विव्ह शहराच्या वायव्येकडील ३० किलोमीटर आणि पोलंडच्या सीमेपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या याव्होरिव्ह लष्करी तळावर ३० हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली’’, अशी माहिती ल्विव्ह प्रांताचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी दिली. रशियाने रविवारी डागलेली बहुतेक क्षेपणास्त्रे युक्रेनच्या हवाई हल्ला संरक्षण प्रणालीद्वारे पाडण्यात आली. पंरतु एका क्रूझ क्षेपणास्त्राने ३५ लोकांचा बळी घेतलो, असेही त्यांनी सांगितले. 

युक्रेनच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिका आणि ‘नाटो’ने याव्होरिव्ह लष्करी तळाचा वापर केला आहे. तेथे ‘नाटो’च्या लष्करी कवायतीही केल्या जातात. त्याला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा केंद्र म्हणूनही ओळखले जाते.

मोदींकडून संरक्षण सज्जतेचा आढावा

नवी दिल्ली : युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेचा आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सुरक्षाविषयक मंत्री समिती (सीसीएस)ची बैठक घेतली. बैठकीत मोदींनी संरक्षण यंत्रणेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यावर भर दिला. तसेच देशाला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत जेणेकरून आपण संरक्षणदृष्टय़ाच मजबूत होणार नाही, तर आपल्या अर्थव्यवस्थेतही भर पडेल, असे मोदी यांनी सांगितले.

युक्रेनमधील भारतीय दूतावास तात्पुरता पोलंडमध्ये

नवी दिल्ली : युक्रेनच्या पश्चिम भागात रशियाच्या आक्रमणामुळे युद्धग्रस्त युक्रेनमधील वेगाने ढासळणारी सुरक्षाविषयक परिस्थिती लक्षात घेऊन युक्रेनमधील आपला दूतावास तात्पुरता पोलंडला हलवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव्हसह त्या देशातील महत्त्वाच्या शहरांनजीक पोहचत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. पुढील घडामोडी लक्षात घेऊन परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल, असे मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे. कीव्हमधील भारतीय दूतावासातील अनेक कर्मचारी याआधीच गेल्या काही दिवसांपासून ल्यिव्ह शहरातील त्यांच्या शिबिर कार्यालयातून (कॅम्प ऑफिस) काम करत आहेत. पश्चिम युक्रेनमधील ल्यिव्ह हे शहर पोलंडलगतच्या सीमेपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russian missiles strike ukraine military base near poland zws
First published on: 14-03-2022 at 00:04 IST